25.3 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणाबाबत धामणी ग्रामपंचायतीचे थेट जिल्हाधिकाऱ्याना पत्र

ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणाबाबत धामणी ग्रामपंचायतीचे थेट जिल्हाधिकाऱ्याना पत्र

संगमेश्वरनजीक धामणी आणि आंबेड येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.  ठेकेदार कंपनीकडून बेजबाबदारपणे नदीत मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली आहे. त्याने भविष्यात गावाला पुराव्हा धोका संभवू शकतो. त्यामुळे हि टाकलेली माती तातडीने काढण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र धामणी ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पाठविले आहे. धामणी ग्रामपंचायतीकडून नदीतील गाळ काढण्यासाठी प्रयत्न सुरु असताना. ठेकेदार कंपनी मात्र नदीवर अतिक्रमण करुन माती थेट नदीत टाकत असल्यामुळे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.

धामणी ते आंबेड या महामार्गाच्या कामामध्ये जवळपास ५०० मिटर पेक्षा अधिक लांबीच्या भागात चौपदरीकरणातील रस्त्याला संरक्षक भिंत उभारताना खोदलेली हजारो ब्रास माती थेट नदीत टाकण्यात येत आहे. धामणी भागात नदीवर अतिक्रमण करुन उभारली जाणारी संरक्षक भिंत ही तांत्रिक दृष्टीने देखील योग्य नसल्याने भविष्यात आजूबाजूच्या परिसरात धोका निर्माण होण्याची भिती धामणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना लिहीलेल्या पत्रात व्यक्त केली आहे .

धामणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की , ठेकेदार कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे भविष्यात धामणी गावाला पूराचा धोका निर्माण होणार असून यामुळे जीवितहानी तसेच वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. असा प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

धामणीचे माजी सरपंच श्रीनिवास पेंडसे यांनी सांगितले कि, आमचा विकास कामांना विरोध नाही. मात्र पर्यावरणाच्या मूळावर उठून केलेला विकास स्थानिकांच्या मूळावर उठणार असल्याचे पेंडसे यांनी नमूद केले . याबाबत आता ठेकेदार कंपनीच्या तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक द्यावी लागेल असा इशाराही श्रीनिवास पेंडसे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular