कोकणातील शेतकर्यांचा हापूस आंबा थेट निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यूरोपच्या प्रगत बाजारपेठेत कोकणातील हापूस आंबा सहजपणे उपलब्ध व्हावा, याकरता ग्लोबल कोकणने पुढाकार घेतला आहे. ग्लोबल कोकणतर्फे यंदा हॉलंड, लंडन, युरोप येथे शेतकरी आंबा बाजार आयोजित करण्यात येणार असून कृषी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत एक्सपोर्ट हापूस आंब्याच्या पेटीचे अनावरण करण्यात आले. सचिन शिनगारे, तेजस भोसले, सचिन कदम या मराठी तरुणांच्या मदतीने संपूर्ण युरोपमध्ये जर्मनी, हॉलंड आणि युनायटेड किंगडम या परिसरात थेट कोकणातून हापूस आंबा जाणार आहे.
प्रसिद्ध निर्यातदार डॉ. दीपक परब या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. संपूर्ण भारतात हापूस आंब्याची बाजारपेठ विकसित करण्याबरोबरच संपूर्ण युरोप आणि जगभरात हापूस आंब्याची बाजारपेठ कोकणातील शेतकर्यांच्या माध्यमातून विकसित करण्याचे ग्लोबल कोकणने निश्चित केले आहे. कोकणातील सुमारे ५०० शेतकर्यांना एकत्र आणून हापूस आंब्याचे प्रमोशन आणि मार्केटिंग देशभरात, जगभरात केले जाणार आहे. याकरता समृद्ध कोकण शेतकरी संघटना कार्यरत झाली असून रत्नागिरी, गणपतीपुळे, राजापूर, आडिवरे, पावस, कुणकेश्वर, विजयदुर्ग, वेंगुर्ला, मालवण, गुहागर, दापोली, केळशी, श्रीवर्धन, अलीबाग, बाणकोट, येथील हापूस आंब्याची ब्रँड ग्लोबल कोकण विकसित करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याला सहकार्य करण्याचा कृषी व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते ग्लोबल कोकणच्या आणि निर्यातीच्या हापूस आंब्याच्या पेटीचा शुभारंभ करण्यात आला आहे, असे ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी सांगितले. हापूस आंब्याच्या निर्यातीबरोबरच मुंबईमध्ये विविध मॉल्समध्ये उत्कृष्ट दर्जाचा हापूस आंबा महोत्सव आयोजित केला आहे. याबरोबरच मुंबई-अहमदाबाद हायवे तळसारी, मुंबई नाशिक, मुंबई पुणे मुंबई कोकण अशा विविध हायवेवर शेतकरी आंबा बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या बाजारात शेतकर्यांचा आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध होईल. शेतकर्यांच्या हापूसला जास्तीत जास्त उत्पन मिळावे यासाठी विविध ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्याचा मानस आहे.