सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून पुरेशा प्रमाणोत नोकर भरती ताबडतोब करावी यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग बँक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने रत्नागिरी शहरामध्ये बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे बाईक रॅली, मानवी साखळी व कँडल मार्च हेही आंदोलनाचे मार्ग अवलंबण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका गेले काही वर्षे क्लार्क व शिपाई यांची आवश्यक त्या प्रमाणात पुरेशी भरती करत नाहीत. त्यामुळे सध्या बँकेत काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढीव ताण पडत आहे. बँक व्यवस्थापन द्वीपक्ष करारातील कामाचे तास या तरतुदींचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणून विना मोबदला अधिक काम करण्यास सांगून त्यांचे हक्क नाकारत आहे.
बँकांमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गरजेनुसार रजा घेणे, वेळेत काम संपवणे दुर्लभ झाले आहे. रोज उशिरापर्यंत काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते. महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्तीसाठी उर फाटेपर्यंत धावणे हे या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून आता नित्याचे झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव वाढला आहे. तणावात काम करावे लागते आहे. त्यांना शारीरिक, मानसिक रोगांना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे कायम स्वरूपाची नियमित कामे कंत्राटी व टेम्पररी कामगारांकडून आऊट सोर्सिंग करून, अल्प मोबदला देऊन करून घेतली जात आहेत. हे द्वीपक्ष करार आणि कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन आहे. तसेच कामगारांचे शोषणही आहे.
देशव्यापी आंदोलन – यावर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (ए. आय. बी. ई. ए) या बँकिंग उद्योगातील शिखर संघटनेने सर्व सरकारी बँकांमध्ये पुरेशी नोकर भरती करा या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी दिनांक २१ रोजी रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग बँक कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने पुरेशा प्रमाणात बँकांमधून नोकर भरती करा या म ागणीसाठी बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस शिवाजीनगर ते जयस्तंभ अशी मोटार बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.
सायंकाळी मारूती मंदिर परिसरामध्ये मानवी साखळीचे नियोजन करण्यात आले होते व कॅण्डल मार्चही झाला. या संपूर्ण आंदोलनामध्येचे जिल्हाभरातील सर्व बँकातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदनाचे आयोजन विनोद कदम, मनोज लिंगायत, निखिल साटम (बँक ऑफ इंडिया) राजेंद्र गडवी, भाग्येश खरे (बँक ऑफ महाराष्ट्र) दीपक वैद्य (युनियन बँक) विजय होळम्ब (कॅनरा बँक) या प्रतिनिधींनी केले.