सुधारित पाणीयोजनेची नवीन पाईप फुटण्याची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये पालिकेसमोर काही अंतरावर चार ते पाचवेळा पाईप फुटत आहे. आज सकाळी पुन्हा तिथेच बसथांब्याजवळ पाइप फुटला. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. एकाच ठिकाणी काही अंतरावर वारंवार पाईप फुटणे हा एक मोठा तांत्रिक दोष आहे; परंतु यावर पालिका प्रशासन किंवा अन्य कोणीही बोलण्यास तयार नाही. मग ही जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुमारे ७३ कोटीची ही पाणीयोजना सुरवातीपासूनच विविध कारणांमुळे वादात सापडली आहे. योजना पूर्ण झाली तरी काही तांत्रिक गोष्टींमुळे ती पुन्हा चर्चेत आहे.
नवीन पाणीयोजना म्हटल्यानंतर शहरवासीयांना सुरळीत आणि विनाखंडित पाणीपुरवठा होणार, अशी सर्वांची अपेक्षा होती; परंतु ही अपेक्षा फोल ठरली आहे. शहरातील जिल्हा परिषदेपासून आठवडा बाजारापर्यंत टाकण्यात आलेले पाईप सदोष असल्याचे बोलले जात आहे. पाणीयोजना सुरू झाल्यापासून आरडीसी बँक ते जयस्तंभ या भागात गेल्या तीन महिन्यांमध्ये पाच ते सहावेळा पाईप फुटला आहे. यावरून या पाईपच्या दर्जाबाबत वारंवार बोलले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पालिकेने सांगितल्याप्रमाणे पाईप टाकल्याचा दावा ठेकेदार कंपनीने केला आहे.
त्यामुळे याची जबाबदारीदेखील प्राधिकरण आणि पालिकेवर आहे. आज दिवसभर फुटलेल्या पाईपची दुरूस्ती करण्यात आल्याने उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. पालिकेसमोरील बसथांब्यासमोर आज सकाळी पुन्हा पाईपलाईन फुटली आहे. आरडीसी बँक, बांधकाम विभागासमोर तर तीनवेळा हा पाईप फुटला आहे. त्यानंतर जयस्तंभ येथे फुटला. आता पुन्हा फुटलेल्या जागेपासून काही अंतरावर पुन्हा आज सकाळी पाईप फुटला आहे. हायड्रोलिक टेस्टिंगवेळीही याच भागात पाईप फुटल्यामुळे टेस्टिंगच बंद केले. ते पुन्हा काही सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागात वारंवार पाईप फुटतो. त्यामुळे हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.