तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजना मंजूर झाली आहे. तेथील योजनेच्या विहिरीचे काम येडगेवाडी येथील तिवटी या ठिकाणी सुरू करण्यात आले; मात्र तिथे येडगेवाडीला पुरेल इतके पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणची विहीर रद्द करून संपूर्ण येडगेवाडीला पुरेल इतक्या क्षमतेची विहीर खोदावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. येडगेवाडीची लोकसंख्या ५०९ आहे, तर २०५३ ची संकल्पित लोकसंख्या ही ९५९ होते.
येडगेवाडीला प्रतिदिन ६३ हजार लिटर पाण्याची मागणी आहे; मात्र सध्या येडगेवाडी तिवटी या ठिकाणी विहीर खोदली आहे. त्या विहिरीत ३ एप्रिल २०२४ ला तत्कालीन उपअभियंत्यांनी केलेल्या तपासणीत प्रतिदिनी ३५०० लिटर पाणी येत असल्याचे कनिष्ठ भूवैज्ञानिकांना पत्राद्वारे कळवले आहे. हे पाणी येडगेवाडीसाठी पुरेसे नाही. येडगेवाडीची भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन राजिवली सरपंचांनी १३ मार्च २०२४ ला आणि आमदार शेखर निकम यांनी विहिरीची जागा बदलण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी ५ एप्रिलला नळपाणी योजनेच्या कामाची पाहणी केली.
त्यावेळी ग्रामीण पुरवठा उपअभियंत्यांना एप्रिल अखेरपर्यंत तिवटी येथील विहिरीची खोली आणि रूंदी वाढवल्यानंतर पाणीपातळीच्या नोंदी घेऊन तसा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते; मात्र सीईओंच्या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. चुकीच्या पद्धतीने होत असलेले खोदकाम थांबवून तिवटीतील विहीर रद्द करावी तसेच मुबलक पाणी मिळेल अशा ठिकाणी नवीन विहीर तयार करून तिथून नळपाणी योजना राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.