बोगद्यातील गळती रोखण्यासाठी ग्राउटिंगचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, दोन पथके दिवसभर कार्यरत आहेत. बोगाद्याच्या डोंगराकडील भागाची पाहणी आयआयटीच्या तज्ज्ञांकडून केली जाणार आहे. त्या ठिकाणी विहिरी, विधन विहिरी किंवा झरे असल्यास ते पाणों अन्यत्र कसे वळवले जाईल या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे पुढील महिन्याभरात हा अभ्यास पूर्ण होईल. याला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दुजोरा दिला. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात १४ ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे दोन्ही बाजूने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
बोगद्यातील गळतीमुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे झाले आहे. बोगद्यातील गळल्या चोपवण्यासाठी तातडीने ग्राउटिंग’चे काम हाती घेतले आहे. वरच्या भागातून गळणाऱ्या पाण्याचा गटाराव्दारे निचरा करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. बहुचर्चित कशेडी बोगद्यातून दोन्ही बाजूंनी वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी झालेला असतानाच ५ दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर बोगद्यात १४ ठिकाणी गळती सुरू झाली आहे.
यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर असून, अनेक वाहनचालकांनी बोगद्याकडे पाठ फिरवली आहे तर काही वाहनचालक जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ होत आहेत. बोगद्यातील दुतर्फा वाहनांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या हालचाली महामार्ग विभागाकडून हाती घेतले आहेत. त्यापूर्वी तांत्रिक सल्लागार एस. के. धर्माधिकारी यांनी बोगद्यातील या गळती लागलेल्या भागाची पाहणी केली. बोगद्याला धोका नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. गळती बंद करण्यासाठी ब्राउटिंग करण्यात येणार आहे.