तिकीट काढण्यासाठी प्रत्येकाने सुट्टे पैसे काढा, असं म्हणण्याची वेळ आता एसटी वाहकावर येत नाही कारण, एसटी गाड्यांमध्ये ‘अॅण्ड्रॉइड तिकीट इश्यू मशिन’द्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. युपीआय, क्युआरकोड आदींमुळे प्रवाशांना रोख पैसे न देता डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढता येते. जिल्ह्यातील सर्व म्हणजे सहाशे गाड्यांमध्ये आता ही मशिन पुरवण्यात आली आहेत. एसटीत चढल्यानंतर गर्दीवेळी एसटी वाहक वारंवार सांगत असतो. प्रत्येकाने तिकीट काढण्यासाठी सुट्टे पैसे काढून ठेवावे.
जर एखाद्याकडे सुट्टे पैसे नसतील तर प्रवाशाबरोबर एसटी वाहकाचा वाद होतो. काही तापट वाहक तर प्रवाशाला पुढच्या थांब्यावर उतरतो; परंतु अॅण्ड्रॉइड तिकीट इश्यू मशिनमुळे या वादांवर कायमचा पडदा पडला आहे. मे. इबिक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकायनि राज्य परिवहन महामंडळातील सर्व वाहकांसाठी नवीन अॅण्ड्रॉइडवर आधारित डिजिटलची सुविधा असलेली तिकीट मशिन घेण्यात आल्या आहेत. सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोनपे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध केल्या आहेत. वाहकाकडे असलेल्या अॅण्ड्रॉइड तिकिट मशिनवर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजकेच पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य झाले आहे. या प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत, सुट्टे पैसे नाहीत म्हणून एसटी वाहकाशी वाद घालण्याचा संबंध येत नाही. त्यामुळे प्रवाशांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.