एसटी महामंडळाच्या अनेक बसची दुरवस्था झाली आहे. अनेक बस मोडकळीस आल्या; तर काही खराब बस रस्त्यावर धावत आहेत. चिपळूण आगारातून कळंबुशी गावाला जाणारी बस आज कामथे घाटात पंक्चर झाल्यावर एसटी महामंडळाचा कारभार सुधारला पाहिजे, अशी प्रतिक्रिया या बसमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी दिली. सावर्डे परिसरातील महाविद्यालये सुरू झाली आहेत. चिपळूणमधून शेकडो विद्यार्थी चिपळूण ते पालवण फाटापर्यंत एसटीने प्रवास करतात. आज सकाळी (एमएच-२०- बीएल-३३४२) ही बस चिपळूण आगारातून कळंबुशीकडे जाण्यासाठी बाहेर पडली. चार किमी अंतर पार केल्यानंतर कामथे घाटात ती पंक्चर झाली. या गाडीत सुमारे ४५ हून अधिक प्रवासी होते.
बस पंक्चर झाल्यावर विद्यार्थी रस्त्यावर उभे राहिले. त्यांना वेळेत शाळा, महाविद्यालयात जायचे होते. ते दुसऱ्या एसटीची वाट पाहत उभे होते; मात्र रत्नागिरी मार्गावर अर्ध्या तासाने बस सुटतात. त्याही वेळेवर सुटत नव्हत्या. प्रथमेश तांबे या विद्यार्थ्याने आगारात फोन लावून बस पंक्चर झाल्याची माहिती दिली. त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
प्रवाशांनी वाहनचालक आणि वाहकाकडे तक्रार केली असता यावर आमचा नाईलाज आहे, असे चालक आणि वाहकांनी सांगितले.चिपळूण ते सावर्डे नेहमी अर्धा तासाचा प्रवास त्याला एक तास लागला. सकाळी नऊनंतर रत्नागिरी मार्गावर फार कमी बस धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. साडेनऊ वाजता हडकणी गाडी कामथे घाटात आली. ती चिपळुणातून येताना फुल्ल होऊन आली होती. त्यामुळे दहा ते पंधरा प्रवाशांना या गाडीत जागा झाली. नंतर मिळेल त्या बसने प्रवासी पुढे निघून आले. एकूणच भंगार बसेसमध्ये प्रवास करणे किती जिकिरीचे झाले आहे, हे प्रवाशांना कळले.