शहराच्या मध्यवर्ती भागात संरक्षित हरितपट्टा असून, त्या पट्टयात पुरातन व पवित्र गरम पाण्यांचे कुंड आहे. या कुंडामध्ये असलेल्या पाण्याला महत्त्व प्राप्त झाले असून, त्या भागाचा विकास करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. परंतू गेल्या १५ वर्षांत या पवित्र कुंडाकडे सर्वच राजकीय पक्ष अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. परिणामी याठिकाणी समाजकंटकांनी तीर्थक्षेत्राला आपला अड्डा बनविले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था होत आहे. खेड शहराला प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक, वारसा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शहरात पुरातन काळातील अनेक खुणा विविध ठिकाणी आढळून येतात. शहरातील खांबतळे, पुरातन लेणी, बंदर परिसर व तेथील शेकडो वर्षे जुन्या समाध्या, गरम पाण्याचे कुंड, भैरी मंदिर आदी ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्याची साक्ष पटते. परंतू ही सर्वच ठिकाणे दुर्लक्षित व अविकसित राहिली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील या ठिकाणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. लाखो रुपयांचा निधी गेल्या कित्येक वर्षांपासून जाहीर होत आहे.
गरम पाण्याच्या कुंडाकडे इतिहास काळामध्ये जेवढे लक्षपूर्वक पाहिले जात होते तसे आधुनिक काळात पाहिले जात नसल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत. खेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे जाण्याकडे पालिकेमार्फत स्वागत कमान, रेलिंग सुशोभीकरणाच्या कामामध्ये लाखो रुपये खर्च झाले आहेत. परंतू सध्याची परिस्थिती पाहता ही रक्कम कोणत्या गोष्टीवर खर्च झाली असा प्रश्न पडतो. प्रवेशद्वाराजवळ वाढलेल्या वेली, पादचारी मार्गाच्या दुतर्फा आठ ते दहा फूट उंच वाढलेली गर्द झाडी, कुंडाच्या परिसरात एक ते दोन फूट वाढलेले गवत, कचऱ्याचा खच, पवित्र कुंडाच्या पाण्यात साचलेला गाळ, परिसरात पडलेल्या रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे हे चित्र विदारक आहे.