जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. उमेदवार बैठका, मेळावे आणि कॉर्नर सभांमध्ये व्यस्त होत आहेत; परंतु काही प्रस्थापित उमेदवारांना चिंता सतावत आहे ती बंडखोरांची. रत्नागिरी तालुक्यात निष्टावंत ठाकरे शिवसैनिक उदय बने यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. राजापूर तालुक्यातही महाविकास आघाडीचे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे, तर गुहागर तालुक्यात देखील बंडखोरी झाली आहे. विधानसभा निवडणुकीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, रिंगणात असलेल्या उमेदवारांनी निःश्वास सोडला आहे. आता उमेदवारांपुढे बंडखोरी थांबविण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यात पाच मतदारसंघापैकी रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर मतदारसंघात नाराजांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत विरुद्ध उबाठा शिवसेनेचे बाळ माने अशी थेट लढत अपेक्षित आहे.
याठिकाणी अपक्षांचा भरणा आहे; परंतु ठाकरे सेनेला बनेंचे बंड शमविण्याची चिंता आहे. बने यांना ठाकरे सेनेकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती; पण आयत्यावेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे सेनेत आलेल्या बाळ मानेंवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे नाराज बनेंनी बंड केले. त्याचा फटका उबाठा शिवसेनेला बसू शकतो. मतांचे विभाजान टाळण्यासाठी ठाकरे सेनेला प्रयत्न करावे लागणार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने विद्यमान उबाठाचे आमदार राजन साळवींना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे शिवसेनेकडून किरण उर्फ भैय्या सामंत महायुतीकडून रिंगणात आहेत. परंतु, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी केल्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. राजापुरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे.
लोकसभेतही काँग्रेसने चांगले मतदान घेतले होते. त्यासाठी अविनाश लाड यांनीही प्रयत्न केले. लाड यांनी माघार न घेतल्यास ठाकरे सेनेला फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. तीच स्थिती गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीपुढे निर्माण झालेली आहे. महायुतीकडून शिंदे शिवसेनेकडून राजेश बेंडल यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. भाजपची ही पारंपरिक जागा असतानाही आयत्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक डॉ. विनय नातू नाराज झाले होते. तर भाजपमधील संतोष जैतापकर यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महायुतीचा घटक पक्ष आरपीआयकडून (आठवले गट) संदेश मोहिते यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यामुळे आव्हान निर्माण करण्यासाठी हे बंड शमविण्याचे महायुतीपुढे आव्हानच आहे.