मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील उड्डाणपुलाच्या कामामागे साडेसाती लागली आहे. पुलाचे काम सुरू झाल्यापासून विघ्नच विघ्न येत आहेत. आठ महिन्यांपूर्वी या पुलाचे गर्डर कोसळले, तर आता पिअर कटिंग सुरू असतानाच पिअर कॅपचा एक भाग व क्रेनचा रोप तुटून कामगार दोन जखमी झाले. त्यामुळे ठेकेदार कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्षात चिपळूण ते अरवली महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात पहिल्या ठेकेदार कंपनीने अंग काढून घेतल्यानंतर ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला पुढील काम देण्यात आले.
त्याच्या माध्यमातून बहादूरशेख येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. पुलाचे डिझाइन आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आले. या पुलाचा जुना आराखडा रद्द करून ६ महिन्यानंतर नवीन आराखडा व डिझाइन तयार करण्यात आले. त्यानुसार तयार करण्यात आलेले सर्व गर्डर चक्काचूर करून नेस्तनाबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पिअरचे कॅप देखील तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. ते काम सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पिअरचा कैंप तुटून बाजूला झाला आणि क्रेनचा रोप ही तुटला. साहजिकच त्यावर उभे राहून काम करणारे दोन कामगार जमिनीवर कोसळले.
तिसरा कामगार वरतीच लटकून राहिला. एका कामगाराच्या पाठीला लोखंडी सळ्यांचा मार लागला आहे. या तिन्ही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामासाठी दोन नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. गंर्डर तसेच अनावश्यक पिअर कॅप तोडण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले असून नवीन अतिरिक्त पिअर उभारणे व पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे काम अन्य एका ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. हे काम सुरू होऊन २० ते २५ दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी ही दुर्घटना घडली. त्यामुळे उड्डाणपुलाच्या मागे लागलेले विघ्न कधी संपणार व पुलाच्या कामाला गती कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे.