26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeMaharashtraराज आणि माझ्यातील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला : उद्धव ठाकरे

राज आणि माझ्यातील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला : उद्धव ठाकरे

जणूकाही पूर्वीची शिवसेना मुंबईकरांनी आणि अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली.

महायुत्ती सरकारने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणक्रमात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा जीआर काढला आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची एकच लाट पसरली. मुंबईत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी याविषयावर रान पेटवले आणि सरकारला आपले जीआर मागे घ्यावे लागले. खरेतर ५ जुलैरोजी भव्य मोर्चा निघणार होता मात्र सरकारने याआधीच माघार घेतल्याने विजय मेळावा घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे वरळी डोममध्ये हा भव्यदिव्य मेळावा पार पडला. जणूकाही पूर्वीची शिवसेना मुंबईकरांनी आणि अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली.

सन्माननीय राज ठाकरे – आपल्या भाषणाची सुरुवात करताना उध्दव ठाकरे यांनी सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख केला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सन्माननीय उध्दव ठाकरे असा उल्लेख केल्यानंतर उध्दव ठाकरेंनीही हाच धाका पकडून सुरुवातीलाच सन्माननीय राज ठाकरे असे म्हटले. (हशा) राज ठाकरे यांनीही मराठी भाषेसाठी भरपूर काही केले आहे असेही उध्दव पुढे म्हणाले. दोन्ही भावांचे किती जुळले आहे हे या सुरुवातीच्या वाक्यावरुनच उपस्थित जनसमुदायाला कळून चुकले.

अंतरपाट दूर केला – पुढे बोलताना उध्दव ठाकरे यांनी कुणाचेही नाव न घेता दोन ठाकरे बंधू एकत्र आणण्यामागे अनाजीपंतांची कामगिरी महत्वाचे असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, आमच्या दोघातील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आपली आसने सोडून शिवसेना आणि मनसैनिकांसह तमाम मराठी माणूस जल्लोष करु लागला.

बुवा, महाराज बिझी – आपल्या खास ठाकरी शैलीत उध्दव ठाकरे यांनी एकेकाचा समाचार घेतला.. मला आज कल्पना आहे अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतोय, कोण रेडा कापतोय, काहीजण गावी जाऊन अंगारे, धुपारे करत आहेत. पण मी एक सांगतो माझ्या आजोबांनी या भोंदूपणाविरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ.

होय आम्ही गुंड – महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. मला म्हणतात उध्दव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले.

उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? – आम्हाला म्हणतात मराठी मुंबईबाहेर नेला. तुम्हाला जर असे वाटत असेल तर २०१४ नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचे सरकार पाडले. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई आमच्या हक्काची – देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य म्हणजे स. का. पाटीलांची आठवण करुन देणारी आहे. त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आमच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. पण मुंबई आपल्या हक्काची आहे, आम्ही लढलो आणि मुंबई ताब्यात घेतली. आता हिंदी सक्ती करत आहेत. पण आम्ही ती लावून घेत नसतो. आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा अस्सल, कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले.

मराठी माणसांनीच वाचवले – ते पुढे म्हणाले, १९९२ – ९३ साली जेव्हा देशद्रोही माजले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठींना सुध्दा आमच्या शिवसैनिकांनी, शिवसनेपाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी हिंदू म्हणून वाचवले होते, मराठी माणसांनी वाचवले होते अशी आठवणही उध्दव ठाकरे यांनी करुन दिली.

एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला – उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांचे नाव न घेताही समाचार घेतला. काल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, ‘झुकेगा नय साला’. पण आपले गद्दार म्हणतात, ‘कुछ बी बोलो, उठेगा नही साला’. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

RELATED ARTICLES

Most Popular