शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसह राज्यातील १ कोटी ५८ लाख ३३ हजार ७१८ शिधापत्रिकाधारकांची यंदाचीही दिवाळी अधिक गोड होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे सलग दुसऱ्या वर्षीही राज्य शासनाने १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सहा वस्तू मिळणार असून, आजपासून (ता. २५) लाभार्थ्यांना त्याचे वितरण होणार होते; मात्र सहा वस्तूपैकी चार वस्तू प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित वस्तू प्राप्त न झाल्याने त्याचे वाटप लांबले आहे. जिल्ह्यात त्याचे लाभार्थी २ लाख ५३ हजारावर आहेत. शासनाने यावर्षीही तरी दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी आजपासून या शिधाचे वाटप सुरू केले आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत रेशन दुकानांतून वितरित केला जाणार आहे. त्यासाठी नागपूर आणि पुण्यातील दोन पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वसामान्य व गरीब जनतेचा सणांचा गोडवा अधिक वाढावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आनंदाचा शिधा’ ही संकल्पना राबवण्यास सुरवात केली. मागील महिन्यात गौरी-गणपती काळातही लाभार्थ्यांना शंभर रुपयांत साखर, तेल, रवा व डाळ अशी प्रत्येकी एक किलोप्रमाणे ‘आनंदाचा शिधा’ संच दिला होता.
गेल्या वर्षी दिवाळीत दिलेल्या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये यावर्षी पोहे व मैदा या अधिकच्या दोन वस्तूंसह सहा वस्तू दिल्या जाणार असल्याने गरीब व सर्वसामान्यांच्या दिवाळी फराळातील गोडवा अधिक रूचकर बनणार आहे. नागपूरमधील जस्ट किचन व पुण्यातील इंडो अलाईड प्रोटिन फूड या दोन पुरवठादार कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे; परंतु जिल्ह्यातील कोणत्याही गोदामामध्ये १०० टक्के वस्तू प्राप्त झालेल्या नाहीत. काही वस्तू अजून न मिळाल्याने शिधा वाटपाचे आजचे वितरण लांबले आहे.