आनंदाच्या शिधा वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. शिधा जिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवी शिवाय वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेचा कोणत्याही परिस्थितीत भंग होणार नाही याची दक्षता घेऊन उर्वरित लाभार्थी यांनी लाभ घ्यावा व जिल्ह्याचे सर्व संच वितरण व्हावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी याना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी २ लाख ५० हजार ८८६ शिधाजिन्नस प्राप्त झाले होते.
या शिध्यामध्ये प्रतिसंचात खाद्यतेल १ लिटर, साखर १ किलो, चणाडाळ अर्धा किलो, रवा अर्धा किलो, मैदा अर्धा किलो, पोहा अर्धा किलो याचा समावेश होता. जिल्ह्यात वितरणासाठी पिशव्या उशिरा प्राप्त झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक २०२४ची आदर्श आचारसंहिता १६ मार्चपासून जाहीर झाल्यामुळे शिधा वितरणाला शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्याचे वितरण ९८.४५ टक्के पूर्ण होते. मंडणगड तालुक्यात १०० टक्के वितरण पूर्ण झाले होते. इतर उर्वरित तालुक्यांमध्ये ३ हजार ९१५ इतके संच शिल्लक होते. शासन निर्णयानुसार, आनंदाचा शिधा संचापैकी जे संच शिल्लक आहेत त्या संदर्भात शिधाजिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवीशिवाय वितरण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.