जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थाविरोधी जोरदार मोहिम सुरू आहे. आतापर्यंत २० ठिकाणी धाडी टाकुन ३६ जणांना अटक केली. त्यामुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांची विक्री, वाहतुक आणि तस्करीवर आम्हाला नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असा दावा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे. एका ठिकाणी राहुन आपली दहशत निर्माण करणाऱ्या ६ जणांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आणखी २५ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.
ते म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री आणि तस्करी सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तरुण पिढीला त्याची सवय लावून त्यांचे आयुष्य बरबाद होण्याची भिती होती. त्यामुळे याचा समुळ उच्चाटन करण्याच्यादृष्टीने आम्ही मोहिम हाती घेतील. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही अंमली पदार्थांचा वाहतुक, विक्री आणि साठवणुक करणाऱ्यांवर बारीक लक्ष होते. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती. आतापर्यंत २० ठिकाणी धाडी टाकून ३६ संशयितांना अटक केली आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी आणि एकाच ठिकाणी राहून आपली दहशत निर्माण करणाऱ्या ६ जणांवर तडीपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.
तसेच २३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आणखी २५ जणांवर तडीपारीचे प्रस्ताव तयार असून येत्या दोन महिन्यात त्यावर निर्णय होईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामध्ये आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी काहीजणांची यादी तयार आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. परंतु रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अशा प्रकारेच कृत्य होत असले तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिला.