22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriगणपतीपुळ्यात व्यावसायिकांची दिवाळी, किनारा गर्दीने फुलला

गणपतीपुळ्यात व्यावसायिकांची दिवाळी, किनारा गर्दीने फुलला

दिवसाला एक कोटीच्या दरम्यान उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

दिवाळीचा पहिला दिवस झाल्यानंतर मुंबई- पुण्यासह विविध जिल्ह्यांतील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळलेली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. येथील प्रसिद्ध श्रींच्या मंदिरात १४ नोव्हेंबरपासून दररोज २० हजार भक्त दर्शन घेऊन जात असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे किनाऱ्यांवरील छोट्या- मोठ्या व्यावसायिकांसह हॉटेल- लॉजिंगवाल्यांची दिवाळी चांगली झाली आहे. पर्यटकांचा राबता रविवारपर्यंत (ता. १९) राहणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान झाल्यानंतर अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडणे पसंत केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे.

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील किनाऱ्यांसह गुहागर, रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावसमध्येही पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे. गणपतीपुळेत प्रचंड गर्दी झाली असून, परजिल्ह्यातून आलेल्या खासगी वाहनांमुळे येथील रस्त्यांवर वारंवार वाहतूककोंडी होत आहे. मंगळवारी गणपतीपुळे मंदिरात १८ हजार पर्यटकांची नोंद झाली. त्यानंतर दरदिवशी २० हजार पर्यटक येऊन गेले. आजही (ता. १७) तेवढीच नोंद झाल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते. येणारा पर्यटक श्रींचे दर्शन घेतल्यानंतर किनाऱ्यावर फिरण्यासाठी जातो. समुद्रस्नानासह फेरीबोटीमधून सफर किनाऱ्यावर घोडे-उंटसवारी, घोडागाडीमधून सायंकाळी फिरणे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

उन्हाच्या कडाक्यामुळे नारळपाणी पिण्यासाठी स्टॉलवर पर्यटक धाव घेत आहेत. फोटोग्राफरनाही याचा लाभ होत असून गेल्या चार दिवसात चांगली कमाई होत आहे. लॉजिंगलाही चांगला प्रतिसाद असून, सध्या सुमारे ८० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला एक कोटीच्या दरम्यान उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. दिवाळीची सुट्टी १९ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे पर्यटकांचा राबताही अजून दोन दिवस राहील, असे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular