कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेला अत्यांचारानंतर तिचा झालेल्या खूनानंतर, देशाच्या कानाकोपऱ्यात संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक शहरात, प्रत्येक रस्त्यावर आपल्या साथीदाराच्या बलात्कार आणि खूनानंतर न्यायाची मागणी करत डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी मुंबईसह राज्यातील सर्व रुग्णालयामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने बंद पुकारला होता. डॉक्टरांच्या या २४ तासांच्या बंदला राज्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून सर्व रुग्णालयांमध्ये २४ तासांसाठी विना-इमर्जन्सी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली होती, त्यानुसार शनिवार कडेकोट बंद पाळत डॉक्टरांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. हा संप रविवारीही चालू राहणार आहे. कोलकाता डॉक्टर बलात्कार- हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवार पासून डॉक्टरांचा २४ तासांचा देशव्यापी संप सुरू झाला. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) हा संप पुकारला आहे. या संपादरम्यान नियमित ओपीडी, वैकल्पिक शस्त्रक्रिया होणार नसल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.
सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि २४ तासांच्या आंदोलनादरम्यान जखमींची काळजी घेतली जाईल, असे म्हटले आहे. २४ तासांच्या संपावर जाण्याच्या घोषणेसोबतच आयएमएने पाच मागण्याही मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निवासी डॉक्टरांच्या कामकाजात आणि राहणीमानात सर्वसमावेशक बदल करण्याची मागणी आणि कामाच्या ठिकाणी आरोग्य व्यावसायिकांविरुद्ध होणारा हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याचा समावेश आहे.