समुद्रात पोहण्याचा मोह पनवेल येथील मुलाच्या जीवावर बेतला. तालुक्यातील आरे-वारे समुद्रात मौजमजा करत पोहणारे दोन तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर स्थानिक जीवरक्षकांना एकाला वाचविण्यात यश आले आहे. सिद्धार्थ विनायक फासे (वय १९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रविंद्र बिरादार यांना वाचिवण्यात यश आले आहे. आज (ता. १७) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुण हा वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक विनायक फासे यांचा मुलगा आहे.
रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेले व सध्या वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक विनायक फासे हे १५ ऑगस्टला आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. दोन दिवस रत्नागिरीत फिरल्यानंतर आज दुपारी ते कुटुंबासमवेत आरे-वारे येथील समुद्र किनारी गेले होते. कुटुंब किनाऱ्यावर फिरत असतानाच त्यांच्या मुलगा सिद्धार्थ हा गुडघाभर पाण्यात उतरला. तो खोल पाण्यात जाऊ नये यासाठी त्याच्या सोबत फासे यांचे मित्र प्रविंद्र बिरादार जवळच उभे होते. सिद्धार्थला खोल पाण्यात जाऊ नकोस, असे ओरडून सांगत होते.
अशातच अचानक एक लाट आली आणि सिद्धार्थ पाण्यात ओढला गेला. प्रविंद्र बिरादार यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. त्याला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आता ओढला गेला. सिद्धार्थला वाचविताना प्रविंद्र बिरादार यांचा श्वास गुदमरू लागल्याने तेही पाण्यात बुडू लागले. नातेवाइकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांसह जीवरक्षकांनी मदतीसाठी धाव घेत प्रथम प्रविंद्र बिरादार यांना बाहेर काढले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पाण्याच्या प्रवाहात ओढला गेलेल्या सिद्धार्थला वाचविण्यात अपयश आले. त्याचा बुडून मृत्यू झाला.
त्याला जीवरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेचे वृत समजताच पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक सौ. सावंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय शिगवण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.