हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला स्थानिकांनी तत्परतेने मदत करत सुरक्षित समुद्रात सोडले; परंतु काही तासांनंतर तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हर्णै बायपासजवळील किनाऱ्यावर डॉल्फिन जखमी अवस्थेत असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी वेळ न दवडता मदतीसाठी धाव घेतली. या बचाव मोहिमेत राखी आंबुर्ले यांच्यासह फहद जमादार, किरण चुनेकर, नारायण खोपटकर आणि धनराज पालेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी हर्णै दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक निर्मळ उपस्थित होते. सर्वांनी सावधगिरीने डॉल्फिनला पाण्यातून बाहेर काढले. त्याला प्राथमिक स्वरूपाची मदत देत सुरक्षितरित्या पुन्हा समुद्रात बोटीच्या सहाय्याने सोडण्यात आले. वेळेत केलेल्या या प्रयत्नांमुळे डॉल्फिनचे प्राण वाचल्याचे वाटत होते; मात्र काही कालावधीनंतर तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर दिसून आला.
परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच फहद जमादार यांनी कांदळवन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर विभागाचे कर्मचारी विश्वंभर झाडे आणि वनरक्षक प्रभू साबणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून संबंधित डॉल्फिनला पुन्हा समुद्रात सोडले. रात्री उशिरा तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर येऊन अडकला. सकाळी स्थानिकांना तो मृत अवस्थेत आढळला. ही बाब तेथील रिसॉर्ट चालकांनी तत्काळ वनविभागाला कळवली. माहिती मिळताच वनरक्षक प्रभू साबणे आणि कर्मचारी विश्वंभर झाडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर डॉल्फिनचे पार्थिव किनाऱ्यावरील वाळूमध्ये खड्डा खणून पुरण्यात आले, अशी माहिती वनरक्षक साबणे यांनी दिली. स्थानिकांनी केलेले तत्पर आणि संवेदनशील बचावकार्य कौतुकास्पद असले, तरी अखेर डॉल्फिनचा करण्यात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

