दोनच दिवसापूर्वी खेर्डी येथील एका टपरी वर धाड टाकून अमली पदार्थ जप्त केल्यानंतर आता थेट सावर्डे येथे अमली पदार्थाचे घबाडच पोलिसांच्या हाती लागले आहे. सावर्डे खोतवाडी नजीक एका घरात तब्बल ५ किलो गांजा सापडला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयीत म्हणून एका महिलेवर गुन्हा दाखल करून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून संपूर्ण चिपळूणात खळबळ उडाली आहे. चिपळूणमध्ये अमली पदार्थांची राजरोस विक्री होत असल्याचे व अनेक तरुण या नशेच्या आहारी गेले असल्याची खुलेआम चर्चा होती.
काही तरुणांना नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली देखील केले होते. हा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे निदर्शनास येताच चिपळूण येथील चिपळूण मूव्हमेंट संघटनेच्या वतीने जोरदार मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष देखील वेधले होते. त्यावेळी पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात मोहीम देखील राबवली होती. त्यामुळे काहीशी जरब बसली होती. आता पुन्हा चिपळूणमध्ये अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानुसार पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले होते. चिपळूण खेर्डी येथील एका टपरीवर गांजा विकला जात असल्याची माहिती मिळताच दोनच दिवसापूर्वी पोलिसांनी थेट धाड टाकली तेव्हा गांजा या अमली पदार्थाच्या ११ पुड्या पोलिसांना मिळाल्या त्याची किंमत २२०० रुपये इतकी होती.
याप्रकरणी टपरी चालक साइराज कदम यांच्यावरच गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक देखील केली असून तो सद्या पोलीस कोठडीत आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असतानाच सावर्डे येथे अमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सावर्डे येथील बाजारपेठेत लक्ष केंद्रित केले होते. बाजापेठेनजीक एका घरात अमली पदार्थाचा साठा असल्याची पूर्ण माहिती मिळताचं पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला आणि थेट धाड टाकली. यावेळी घरात सुमारे ५ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला, हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी संशयीत म्हणून मीनाक्षी बाळू जैस्वाल (५१) या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.