मागील मार्च वर्षापासून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. काही प्रमाणात वाढ होते तर काही प्रमाणात कमी होताना सुद्धा दिसते प्रमाण, परंतु सध्या संसर्गाचा दर हा वरचढच दिसत आहे. शासन आपल्या परीने आवश्यक ती उपाययोजना करत आहे.
मार्च महिना म्हणजे ऐन लग्न सराईचा हंगाम. लग्न म्हणजे सर्वांच्या आयुष्याची नवीन सुरुवात. नवीन आयुष्याला सुरुवात करायची तर, थोरा–मोठ्यांचे आशिर्वाद, मित्र मैत्रिणींची सांगत असे स्वप्नवत असते. परंतु, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, सगळीकडे असलेली संचारबंदी, कोरोना निर्बंधित नियमावली त्यामुळे अनेक ठरलेली लग्न अजून दीड वर्ष उलटून गेले तरी पण वेटिंग वरच आहेत. त्यामुळे पालक वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. वधू-वरांच्या हातावर मेहेंदी लावायच्या ऐवजी सॅनिटायझर लावायची वेळ आली असल्याचे म्हटले जात आहे.
काही पालकांनी आणि वधू-वरांनी या कोरोनाच्या काळामध्ये सुवर्णमध्य काढून एक तर ठरलेल्या नियमावली प्रमाणे २५ नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा आटपला, तर काही जणांनी कोर्ट मॅरेज म्हणजेच नोंदणी विवाह करण्यावर भर दिला. परंतु, कोरोना काळामध्ये कोर्टाच्या तारखा मिळताना सुद्धा अनेकजणांच्या नाकी नऊ आले. कोरोना संसर्गामुळे कामकाज बंद असल्याने अनेकांची विवाहाची स्वप्न अजून ठरून पण अपूर्णच राहिली आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी विवाह लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे अनेक पालक आणि वधू वरांचा नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. काही जणांना डामडौलामध्ये लग्न करण्याचे असल्याने अजूनही विवाहाचा मुहूर्त काढून वाट पाहत आहेत. लग्न मंडप सुद्धा कोरोनामुळे रिकामी पडले आहेत. पण कोरोनाची लक्षणे कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही आहे.