दीपक केसरकर पुरस्कृत कै. वसंतशेठ केसरकर स्मरणार्थ ‘गुरुसेवा’ शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. यावेळी २७ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री केसरकर बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, जिल्हा बँक माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, परफेक्ट अॅकॅडमीचे राजाराम परब, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.
माझ्याकडे शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर अनेकांनी या पदात ताकद नाही, असे म्हटले होते; मात्र खरी ताकद ही शिक्षणातच आहे, हे दाखवून आपल्याला द्यायचे आहे. या क्षेत्रात काम करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. त्यासाठी दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शैक्षणिक क्रांती करण्यासाठी निश्चितच काम करेन, असा विश्वास आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षकांना अतिरिक्त जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कौशल्यात्मक गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना आठवीपासूनच व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यासंदर्भात विचार सुरू आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन. त्यामुळे शिक्षकांनी कोणतीही अडचण आल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा, त्यातून नक्कीच मार्ग काढला जाईल. सिंधुदुर्गात शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी येथे कार्यरत शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे.
राज्यासह जिल्ह्यात वेगळी शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकातच विद्यार्थ्यांना नोट्स देण्याची संकल्पना मांडली असून ती लवकर अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्यांचा खर्च कमी होणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल.’’ असे त्यांनी सांगितले.