चक्रीवादळ, महापूर किंवा बदलत्या वातावरणाचा परिणाम इतर पिकांप्रमाणे नारळावरही होत आहे. त्यादृष्टीने कोकण कृषी विद्यापीठीच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात प्रयोग करण्यात येत आहेत. यामध्ये जैविक व अजैविक ताण सहन करू शकणारे वाण तयार करणे, उपलब्ध वाणांच्या चाचण्या घेणे असे पीक सुधारण्याचे संशोधन कार्य प्राधान्याने करण्यात येत आहे. शाश्वत उत्पादन तंत्र विकसित करण्यासाठी एकात्मिक पिक पद्धतीत, कुक्कुटपालन, भाजीपाला, फळे यांचा समावेशही करण्यात येत आहे, अशी माहिती प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी दिली.
नारळ दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. मालशे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, अलिकडच्या काळात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्याचप्रमाणे बदलत्या वातावरणाचा परिणाम फलोद्यान पिकांवर होत आहे. नारळ हे किनारपट्टीच्या भागात येणारे पीक आहे. चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जावे लागते. अशा वेळी नारळाचे खूप नुकसान होते. तर क्वचितप्रसंगी बागा उद्ध्वस्त होतात.
माडाची वाढीची अवस्था तसेच हवामान आणि त्याचा उत्पन्न यांचा परस्पर असलेला संबंध यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात प्रयोग करण्यात येत आहेत. जेणेकरून उत्पादनाचा अंदाज घेता येईल. सन २०२० – २०२१ वर्षामध्ये सातत्याने झालेली चक्रीवादळे, एकूण पर्जन्यमानात चढउतार, उन्हाळी पडणारा पाण्याचा ताण या बाबींचा नारळाची होणारी वाढ, फळधारणा, यावर होणारा परिणाम यांचा अंदाज घेता आला. त्यादृष्टीने भविष्यात आपत्कालीन नियोजन यावर संशोधन तसेच बागेचे व्यवस्थापन, उपाययोजना यासाठी दिशा मिळेल, असे डॉ. मालशे यांनी सांगितले.
पांढऱ्या माशीवर उपाय – नारळावरील रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी एक किलो रिठा साल १०० लिटर पाण्यात तीन दिवस भिजत ठेवावी. हे द्रावण गाळून घ्यावे आणि या द्रावणाची एक महिन्याच्या अंतराने दोन वेळा नारळाच्या झावळांवर फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे, डॉ. मालशे यांनी सांगितले.
नारळ बागायत समाज – आशिया आणि पॅसिफिक खंडातील नारळ बागायदार समाज या संस्थेची स्थापना २ सप्टेंबर १९६९ रोजी झाली. नारळ उद्योगामधील कार्यक्रमांना प्रोत्साहीत करणे, नारळ उत्पादन वाढविणे, व्यापार आणि प्रक्रिया उद्योगात गुंतलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे. संस्थेचा स्थापना दिन जागतिक नारळ दिन साजरा करण्यात येतो.
कोकण विद्यापीठाचे कार्य आणि संशोधन – नारळ सोलणी यंत्र, नारळ काढणीच्या समस्येवर ट्रॅक्टरचलित शिडी विकसीत. नारळ बागेत आंतरपिक मसालापिकांची लागवड. त्याकरिता नवीन जाती विकसित. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामार्फत आणि विद्यापीठामार्फत दरवर्षी नारळाच्या बाणवली टी बाय डी, डी बाय टी, प्रताप व इतर जातींची मिळून रोपे दरवर्षी शेतकऱ्यांना वितरित केली जातात.