दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘जेलर’ चित्रपटातील भूमिकेबद्दल एकूण २१० कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. ‘सन पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेचे संचालक कलानिधी मारन यांनी रजनीकांत यांना १०० कोटींच्या मानधनाच्या धनादेशाचे पाकिट दिले. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करून ही माहिती दिली. विशेष म्हणजे, रजनीकांत यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी यापूर्वीच ११० कोटींचे मानधन देण्यात आले होते. चित्रपटाने चांगली कमाई केल्याने त्यांना १०० कोटींचे हे अतिरिक्त मानधन मिळाले. त्यामुळे, रजनीकांत देशातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत, असेही विजयबालन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांनी मारन रजनीकांत यांना १०० कोटींचा धनादेश देत असल्याचे छायाचित्रही शेअर केले. ‘जेलर’ चित्रपटाच्या माध्यमातून दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलेल्या रजनीकांत यांचे चाहत्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे. विजयबालन यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, की रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाने जगभरात अवघ्या २२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ६२५ कोटींची कमाई करून मैलाचा दगड गाठला. आता हा चित्रपट ६५० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.