तीन वर्षांपूर्वी २१ जुलै २०२१ ला शहरात महापूर आला. त्यावेळी अमावस्या होती. समुद्राला आलेली भरती, मुसळधार पाऊस आणि इतर अनेक कारणांमुळे चिपळुणात महापूर आला. यावर्षी २१ जुलैला पौर्णिमा होती. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे चिपळूणचे प्रशासन अलर्ट मोडवर होते. समुद्राची भरती-ओहटी लक्षात घेऊन कोयनेच्या वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे यावर्षी २१ जुलैला मुसळधार पावसानंतरही शहरातील जलसंकट टळले. तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर नद्यांना पूर येतो. दरडी कोसळून निष्पाप लोकांचे जीव जातात.
पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सिद्ध असल्याचा दावा केला जातो; मात्र प्रशासनाची यावर्षीची तयारी त्याला अपवाद आहे. यावर्षी तीनवेळा शहरात पाणी भरण्याचे संकट निर्माण झाले. तिन्हीवेळा प्रशासनाने योग्य नियोजन करून जलसंकट टाळले. यावर्षीच्या २१ जुलैला तीन वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीचे नियोजन केले. भरती असताना समुद्राचे पाणी गोवळकोटच्या खाडीत येते. त्याचवेळी कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती सुरू असताना कोयनेचे पाणी अरबी समुद्राकडे गेल्यानंतर भरतीमुळे ते पाणी पुढे जात नाही.
पाण्याचा फुगवटा तयार झाल्यानंतर ते पाणी शहरात शिरते आणि शहरात पुरासारखी स्थिती तयार होते. या गोष्टीकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे २०२२ मध्ये तब्बल ११ वेळा शहरात पाणी भरले होते. यावर्षी शनिवारी रात्री ११.३० वा. अरबी समुद्राला भरती होती. त्यामुळे रात्री ९ नंतर कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मर्यादा आणली. मध्यरात्री १ नंतर भरतीचे पाणी ओसरले. त्यानंतर कोयनेतून पुन्हा वीजनिर्मिती सुरू झाली. त्यामुळे वाशिष्ठी नदीत दरवर्षी तयार होणारा पाण्याचा फुगवटा यावर्षी तयार झाला नाही. कोळकेवाडी धरणावरही पाण्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली.
अरबी समुद्रातील भरती ओहोटीची वेळ बघून कोयनेच्या वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आले. रविवारी रात्री १२.३० वा. भरती असल्यामुळे पुढील २४ तासातील वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. पालिकेकडून सावधानतेचा इशारा दिला जात होता. रविवारी दुपारी १ वा. पाण्याचीं सर्वाधिक पातळी ४.४२ इतकी होती. सकाळी ९ ते ११ पर्यंत कोयनेची वीजनिर्मिती चालू होती. त्यानंतर पुढील परिस्थिती लक्षात घेऊन वीजनिर्मिती बंद केली होती. वाशिष्ठी आणि शिवनदीतील पाण्याची पातळी एक तासाने मोजली जात होती. रविवारी सुट्टी असतानाही प्रशासकीय अधिकारी ड्युटीवर होते. परशुराम घाट आणि कुंभार्ली घाटातील परिस्थितीची माहिती घेतली जात होती. वाशिष्ठी नदीत येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यामुळेच जलसंकट यावर्षी टळले.