दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना आपला पदाचा कार्यभार हा उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे द्यावा, असे आदेश दिले असतानाच उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान ममता मोरे यांनी आपण कोणालाही नगराध्यक्ष पदाचा पदभार दिला नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला असताना नुतन नगराध्यक्षपदासाठी २८ मे रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. दापोली नगरपंचायतीच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा सौ. ममता मोरे यांच्याविरोधात ५ मे २०२५ रोजी विशेष सभेत अविश्वास ठराव १६ विरूध्द १ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी हा ठराव मंजूर केल्याने दापोली नगरपंचायतीचे अध्यक्ष पद हे रिक्त झाले. यानंतर नगरपंचायत दापोलीच्या प्रशासनाने ६ मे रोजी जिल्हा प्रशासनाला उपनगराध्यक्षांकडे अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला नसल्याचे सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मे रोजी एका पत्रानुसार उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे पदभार सोपवावा असे आदेश दिले. आहेत. या आदेशानुसार गुरूवारी दि. १५ मे रोजी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला. तर मावळत्या नगराध्यक्षा सौ. ममता मोरे यांनी आपल्या विरोधात प्रशासनाकडून अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे भासवले आहे. परंतु प्रत्यक्षात सभागृहात तसा प्रस्ताव मांडलाच गेला नाही. या बेकायदेशीर प्रस्तावाच्या विरोधात मी नगरविकास मंत्रालय व उच्च न्यायालयात अपिल केले आहे. आपण या कामासाठी मुंबईत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला असल्याचे आपल्याला समजले. यामध्ये उपनगराध्यक्षांकडे मी कार्यभार सोपवावा असे नमूद केले आहे. मात्र मी मुख्यालयाबाहेर असल्याने कोणताही कार्यभार कोणालाही सोपवला नसताना प्रशासन व उपनगराध्यक्ष यांना नगराध्यक्ष पदासाठी कसली घाई लागली आहे हे माझ्या आकलनाच्या पलीकडे असून त्यांच्या कृतीने आपण अचंबित झालो आहोत, असे याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
२८ मे ला निवडणूक – दरम्यान दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम व जाहीर झाला असून २८ मे रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुरूवार दि. २२. मे रोजी सकाळी ११ ते २ व वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. दु. २ वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाम निर्देशन नाकारलेल्या उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावणे, सोमवार दि. २६ मे रोजी नामनिर्देशन फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांसाठी अपील मुदत, सायंकाळी ५ नंतर वैधरित्या नामनिर्दे शन सादर केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे, मंगळवार दि. २७ मे रोजी दु. ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, बुधवार दि. २८ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष निवडणूक तसेच आवश्यक असल्यास मतदान व निकाल घोषित करण्यात येणार आहे. दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.