दोन दिवसांपूर्वी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सुधीर दाभोळकर यांची निवड जाहीर केली होती; मात्र या निवडीवरून काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद निर्माण झाला. तालुकाध्यक्षपदाची निवड परस्पर व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता केली असल्याचा आक्षेप घेत याविषयी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई दादर टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी या निवडीला स्थगिती दिली व चार दिवसांत तालुकाध्यक्षांची पुन्हा निवड करण्याचे ठरले. प्रशांत यादव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी अचानक सुधीर दाभोळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यामार्फत ही निवड झाली होती; मात्र त्यांच्या या निवडीला जोरदारपणे पक्षांतर्गत विरोध झाला. एवढेच नव्हे तर काहींनी पक्षाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला. पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर केली, तसेच पक्ष निरीक्षकांचा अहवाल सादर न होताच ही निवड जाहीर केल्याने आक्षेप घेण्यात आला. याबाबत काँग्रेस शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, महिला काँग्रेस शहराध्यक्ष श्रद्धा कदम व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्यासह महिला आघाडी व सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
अखेर या नाराजीची प्रदेश स्तरावर दखल घेत शुक्रवारी तातडीने मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीला चिपळुणातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. दाभोळकर यांच्या निवडीला एकमताने विरोध केला; तसेच या परस्पर घेतलेल्या निर्णयाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत तालुकाध्यक्षांच्या निवडीला स्थगिती दिली, तसेच याबाबत चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे घोषित केले. प्रदेशाध्यक्षांच्या या निर्णयावर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.