राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्येम्ध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत चालली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे. एकीकडे लॉकडाऊन होण्याचे संकेत तर दुसरीकडे वीज ग्राहकांच्या वाढत्या वीज बिलाच्या तक्रारींची संख्याही वाढली आहे. यासंदर्भात मंत्रालयामध्ये वीज बिल व थकबाकी बैठक झाली. यावेळी वीज ग्राहकांना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आवाहन केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन झाल्याने मीटर रीडिंग न घेता मागील बिलाप्रमाणे सरासरी बिल वीज ग्राहकांना अवास्तव आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तसेच कोरोना काळात नोकऱ्या गेल्याने अनेकजण बेरोजगार झाल्याने वेगवेगळ्या पक्षांकडून आणि संघटना यांच्याकडून वाढीव विज बीलाच्या विरोधात आंदोलने करण्यात आलीत. या गोष्टी पुन्हा उद्भवू नये म्हणून याच गोष्टीवर उपाय योजण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी महत्वपूर्ण बैठक बोलावली. यावेळी वाढीव वीजबिल येण्यावरून ग्राहकांचा असणारा रोष पाहून त्यांनी ग्राहकांना एक सल्ला देखील दिला आहे.
कोरोना काळात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रीडिंग न घेता वाढीव बिले पाठवण्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांच्यावतीने आल्या आहेत. त्यामुळे शक्यतो मीटर रीडिंग घेऊनच वीज बिले पाठवण्यात यावीत. कोरोनामुळे काही वेळेला महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी मोबाईल अॅपद्वारे रीडिंग महावितारणाकडे पाठवले तर, तुम्ही पाठविलेला रीडिंगनुसार बिल पाठविता येईल. कोरोनाच्या विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वीज ग्राहकांनी प्रत्येक महिन्याला स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन नितीन राऊत यांनी केले.
काही ठिकाणी थकबाकी वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या असून, त्या कदापी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देत ग्राहकांना ऑनलाइन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार करता येणार नाही किंवा मोबाइल अॅपचा वापर करू शकत नाही, त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात जाऊन ऑफलाइन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश नितीन राऊत यांनी यावेळी दिले.
वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज सुमारे ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच वीज खरेदी कराराचे पुनरावलोकनही करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपची सत्ता असताना त्यांनी मुद्दामहून केलेल्या गैर व्यवस्थापनामुळे महावितरण कंपनीवर एवढा मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक राहिली आहे. भाजपने अतिरिक्त प्रमाणातील थकबाकी वाढवून महावितरणाचे खासगीकरण करण्याचे योजिले होते. परंतु, आम्ही या थकबाकीचा बोजा वसूल करून खासगीकरणाचे संकट टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आता अस्वस्थ झालेले भाजपचे नेते महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापूर्वीही केली होती.