25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriमुख्य ध्वजवंदनाला अभियंता गैरहजर, जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला लेखी अहवाल

मुख्य ध्वजवंदनाला अभियंता गैरहजर, जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला लेखी अहवाल

याची दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजवंदनाला गैरहजर राहणे रत्नागिरी पाटबंधारे कार्यालयातील मृद व जलसंधार विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना महागात पडले आहे. त्यांच्या या गैरहजेरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत लेखी खुलासा मागवला आहे. त्यामुळे त्या अभियंत्यांची गैरहजेरी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रत्येकाच्या मनात जागवण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने हर घर तिरंगा अभियान राबवून देशभक्तीची भावना निर्माण केली जात आहे. यासाठी अगदी ग्रामपातळीपासून देशपातळीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन केले.

प्रत्येक शासकीय कार्यालयाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासकीय इमारतींनाही विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. पाटबंधारे विभागाची इमारतही आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली होती. काही लघु पाटबंधारे प्रकल्पांवरील व पाण्यावरील रोषणाई आकर्षणाचा विषय ठरली होती; परंतु हे उपक्रम राबवत असताना काही अधिकारी मात्र या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवापासून लांब राहिल्याचे दिसून आले. पाटबंधारे विभागातील मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता स्वातंत्र्यदिनी मुख्यालयातील झेंडावंदनाला गैरहजर असल्याची चर्चा सुरू झाली.

कर्मचाऱ्यांमध्ये ती अधिक रंगली होती. याची दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली. त्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते गैरहजर असल्याचे दिसले. त्याबाबत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित अभियंत्यांकडून लेखी खुलासा मागवला आहे. खुलाशाचा विचार करून त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

RELATED ARTICLES

Most Popular