उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अभियांत्रिकी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि प्रवेशाबद्दल करण्यात आलेले बदल याबद्दल माहिती दिली आहे.
अभियांत्रिकी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पर्यंत थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येणार आहे आणि या अभ्यासक्रमासाठी सीईटी रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी असलेल्या अटीप्रमाणे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते.
ती अट आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट / अग्रिकल्चर/ कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी/ अभियांत्रिकी ग्राफिक्स/ बिझनेस स्टडीज/ एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाली असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज करताना संबंधित उमेदवार विवादित सीमा क्षेत्रातील आहे, असा उल्लेख असलेले प्रमाणपत्र जोडावे लागत होते. त्यामुळे कर्नाटक राज्यातील सक्षम अधिकार्याकडून वरील प्रमाणपत्र घेताना विवादीत सीमा क्षेत्रातील या शब्दामुळे अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे सरकारने आत्ता विवादित हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधी काही अडचणी येणार नाहीत.