जरी मी शिक्षणमंत्री नसलो, तरी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवून मुख्याध्यापक व शिक्षकांची शाळाबाह्य कामातून मुक्तता करण्यासाठी वचनबद्ध आहे. लवकरच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी शिक्षणमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या सभेवेळी जागेवर प्रश्न सोडवून पालकमंत्री सामंत यांनी कार्यतत्परतेची चुणूक दाखवली. जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शिर्के हायस्कूल येथे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या व गुणवत्तेच्या बाबतीत आढावा सभा घेण्यात आली.
या वेळी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, वरिष्ठ लेखाधिकारी प्रवीण बिरादार उपस्थित होते. मंत्री सामंत यांच्यासमोर शैक्षणिक समस्या मांडल्या. त्यातील काही समस्या पालकमंत्री सामंत यांनी तत्काळ सोडविल्या. सद्यस्थितीत दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक शाळांमधून उपस्थित असणे गरजेचे आहे. अशा स्थितीत सहावी ते आठवी, नववी ते बारावी यांचे प्रशिक्षण लावले आहे. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्याचे काम बाजूला ठेवून जावे लागत आहे. सर्व प्रशिक्षणे बोर्डाच्या परीक्षा व पेपर तपासणी झाल्यानंतर घेण्यात यावीत, अशी विनंती मुख्याध्यापक केली.
यावर पालकमंत्री सामंत यांनी डायट प्राचार्यांना फोन करून प्रशिक्षणे तत्काळ थांबविण्याच्या सूचना केल्या. वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार जास्तीत जास्त शाळांना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. टप्पा अनुदानावरील शाळांना पुढील टप्पा देण्याबाबत, २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, शिक्षकेतर भरती तत्काळ करावी, विनाअनुदानित अथवा टप्पा अनुदानित वरून अनुदानित शाळेत बदलीवरील बंदी तत्काळ उठवावीव, संच मान्यतेतील त्रुटी दूर कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.