चिखलीवरून चिपळूण येथे अवैध पद्धतींने खैराच्या झाडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह खैराची लाकडे असा एकुण २० लाखांचा मुद्देमाल पनवेल वनविभागाने बुधवारी रात्री जप्त केला आहे. वनविभागाची ही मोठी कारवाई असून यात जवळपास ६ लाख रुपयांची १० टन खैराची लाकडे असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे. ही कारवाई बुधवारी उशीरा रात्री कळंबोली सर्कलजवळील ब्रिजवर करण्यात आली आहे. मुद्देमालासह २ आरोपींना वन वनविभागाने ताब्यात घेतले असून, अक्रम युसुफ खान शेख (वय २४, कडोदे, बारदोली, सुरत) आणि मंसुरी महंमद शहीद सलीम (वय २७, कडोदे, सुरत) अशी दोघांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वन विभागाला बेकायदेशीर खैराची वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून ट्रकची तपासणी केली. या कारवाईत जवळपास १० टन खैराची लाखो रुपयांची लाकडे जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे कोणताही निर्गत पास परवाना नसल्याचे आढळून आले. ट्रक आणि माल जप्त करून दोघांवर वन अधिनियम आणि भा.दं.वि. कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास, वन अधिकारी करत आहेत.