खेड तालुक्यातील तळे चिंचवाडी येथील लक्ष्मण विठू कदम यांच्या निवासस्थानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. कदम हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असून, त्यांच्याकडे गृहप्रवेशनिमित्ताने ही भेट होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. शुक्रवारी रायगड येथील एका शासकीय कार्यक्रमाच्यानिमित्ताने शिंदे येणार होते. परंतु त्या कार्यक्रमाच्या अगोदरच खेड येथील काल अचानक रात्री ठरलेल्या या दौऱ्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई -गोवा महामार्गावरील भरणे नाक्यापासून तळे गावापर्यंत खेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शुक्रवारी दुपारी बारा वाजता शिंदे यांचे कुटुंबीयांसमवेत भरणे नाका येथील हेलिपॅडवर आगमन झाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, चंद्रकांत चाळके, मिलिंद काते यांच्यासह शिवसेनेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सुकीवली ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी सरपंच व शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून तळे चिंचवाडी येथील शिंदे यांचे नातेवाईक लक्ष्मण कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन कौंटुबिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी देखील अनेक स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनी हेलिकॉप्टरने महाडच्या दिशेने वाटचाल केली. मुख्यमंत्री महोदयांनी अचानक केलेल्या खासगी दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली, परंतु त्यांच्या या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.