विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या सर्वच ४० आमदार व ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवल्या आहेत. आमची न्याय बाजू त्यांच्यासमोर मांडली जाईल. ज्या पध्दतीने निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या समोर गेलो त्याचपध्दतीने विधानसभा अध्यक्षांसमोर जाऊ असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सहभागाने कोणाचा पोपट मारला आहे हे स्पष्ट झाले आहे असे ते म्हणाले. दोन दिवस रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीं पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही आमची बाजू मांडणार असून, विधानसभा अध्यक्ष कुणावरही अन्याय करणार नाहीत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन कुणाचा पोपट मारला आहे हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता उरलेले टिकावेत यासाठी खा. अरविंद सावंत हे बोलत आहेत.
त्यांनी अनेक तारखा दिल्या, मात्र त्यांच्या मनातील पोपट काही मेला नसल्याची टिकाही ना. सामंत यांनी केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शरद पवार हे मागील ५६ वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यांना मानणारा मोठा गट राज्यात आहे. परंतु युतीमध्ये येताना अजित पवार हे ‘नंबर’ घेऊन आले आहेत. वयाच्या ८३व्या वर्षीही शरद पवार सांगितलेला शब्द पूर्ण करतात, हा त्यांचा गुण काहीजणांनी घ्यावा, ही माझी त्यांना विनंती असून सल्ला नसल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांच्या मनातील ईच्छा पूर्ण होऊदेत आणि ईच्छांचा विचार करतानाच शिंदे यांचा विचार करावा असेही त्यांनी सांगितले.
आमच्या सोबत आलेल्या ५० आमदारांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री राजिनामा देणार नाहीत. आम्ही राजिनामे घेणारे आहोत, बारा महिन्यापूर्वी राजीनामे कसे घेतो हे अख्ख्या देशाने बघितले असल्याचेही त्यांनी सांगितले आमचीही राजापुरात दमदार एंट्री असणार आमचीही आता राजापूर मतदार संघामध्ये दमदार एंट्री होणार आहे. या मतदार संघातील लांजामध्ये नागरिकांच मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जाणार असल्याचेही शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी सांगितले.