मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना राजापुरातील बारसूमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येईल अशी ग्वाही दिली. माती परीक्षणाचा अहवाल सकारात्मक असल्याचे सांगताना पुढील कामकाजाबाबत चर्चा सुरू आहेत, अशी माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच रिफायनरीवरून राजकारण तापू लागल्याचे स्पष्ट दिसते आहे. रिफायनरी होणारच असे सांगत फडणवीसांनी शिंदेंची कोंडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
किरण सामंतांचे आश्वासन – बहुचर्चित बारसु रिफायनरी हा विषय आपल्यासाठी संपला असून या भागात प्रदूषणमुक्त मोठा प्रकल्प आणण्याचे आश्वासन आ. किरण सामंत यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि विजयी झाल्यावर देखील अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू रिफायनरीचा पुर्नउच्चार केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनदेखील आ. किरण सामंत यांनी दिले होते.
७ जणांविरूध्द अटक वॉरंट – गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शिवसेनेचे नेते देत असतानाच माती परीक्षणाच्यावेळी आंदोलन करणाऱ्या रिफायनरी विरोधी ७ आंदोलकांविरूध्द अटक वॉरंट काढण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुतीच्या नेत्यांच्या विचारांची ‘रिफायनरी’ झाली असे वाटल्याने स्थानिक शेतकऱ्यांची सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबाबतची भूमिका मवाळ झाली होती, असे बोलले जाते.
बारसूचा प्रस्ताव – केंद्रात भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प करण्याचा प्रयत्न सुरू झाला. नाणार परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने नाणार रिफायनरी जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द करण्यात आली. राज्यात सत्तानंतर होऊन महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आली. उध्दव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना नाणार ऐवजी बारसू पंचक्रोशीतील जागा उपलब्ध करून देण्याचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं. मात्र, या पत्रावर कार्यवाही होण्यागोदर राज्यात सत्तानंतर होऊन मुख्यमंत्रीपदी महायुतीचे एकनाथ शिंदे विराजमान झाले.
बंदोबस्तात माती परीक्षण – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसु रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात बारसू येथे २४ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत माती परीक्षण केले. यावेळी स्थानिक जनतेने मोठे आंदोलन देखील केले. या आंदोलकांवर गुन्हे नोंद करून अनेकांना जिल्हा बंदीच्या नोटीसा काढल्या होत्या.
नेत्यांच्या विचारांची ‘रिफायनरी’ – राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरीला माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी विरोध केला होता. त्यानंतर नारायणराव राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली भूमि का बदलून रिफायनरीला समर्थन दिले. बारसु रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत होणार अशी भूमिका घेणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरीबाबत मवाळ भूमिका घेत जनतेला रिफायनरी नको असेल तर रिफायनरी लादणार नाही असे सांगितल्याची चर्चा सुरू आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनीही हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेऊन रिफायनरी प्रकल्पाऐवजी प्रदूषणमुक्त प्रकल्प आणणार असल्याचे जाहीर केले होते. निवडणुकीच्या दरम्यान, रिफायनरी समर्थकांच्या विचारांची ‘रिफायनरी’ (म्हणजे शुध्दीकरण) झाल्याची चर्चा निवडणूक प्रचारात सुरु होती. मात्र, भाजपा नेत्यांनी रिफायनरीचे समर्थन केले होते.
माती परीक्षण अहवाल गुलदस्त्यात – प्रस्तावित बारसु रिफायनरी प्रकल्पासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात २३ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत माती परीक्षण केले. माती परीक्षण करून वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी माती परीक्षण अहवाल जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. माती परीक्षण अहवाल अद्याप आला नाही असं उदयोग मंत्री उदय सामंत यांनी मध्यंतरी येथील ग्रामस्थांना सांगितले होते, अशी माहिती काही रिफायनरी विरोधी ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारसू माती परीक्षण अहवाल सकारात्मक आला असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे बारसू माती परीक्षण अहवाल नेमका काय आहे याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
शिवसेना नेत्यांची कोंडी? – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांना फडणवीसांनी ब्रेक लावला आहे. राज्यातील घडामोडीतून बारसु रिफायनरी मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेत्यांची कोंडी करीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
७ आंदोलकांविरोधात अटक वॉरंट – दरम्यान बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून माती परीक्षण केले होते. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यावेळी विरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलक अमोल बोळेसह ७ जणांवर सरकारी कामात अडथळा केला म्हणून ३५३ कलम लावून गुन्हा दाखल केला होता. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी आंदोलक गैरहजर राहिल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने अमोल बोळेसह ७ जणांविरूध्द अटक वॉरंट काढले आहे.