सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना कोकणी ग्रामीण भागात मात्र शेतकरी ऐन दिवाळीच्या दिवसांत शेताच्या बांधावर काम करताना दिसत आहे. उन्हात कष्टरूपी घामाच्या धारांनी पहिली आंघोळ करणारा शेतकरी ऐन दिवाळीत दैनंदिन कामात व्यस्त आहे. दिवाळीपूर्वी पावसाचे सावट असल्यामुळे वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये म्हणून बळीराजाची घालमेल पाहायला मिळत आहे. दीपावलीचा सण सर्वत्र साजरा होत आहे. फराळ, मिठाई, फटाके, विविध खरेदी यावर जोर आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या नेहमीच्या कामांमध्ये व्यस्त राहून दिवाळी साजरी करीत आहे. अवेळी आलेल्या पावसाने भाताचे प्रचंड नुकसान केले. कापणीची कामे खोळंबली. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी शेताच्या बांधावर असल्याचे चित्र आहे. धान्य ठेवण्यासाठी अंगणाची जागा चोपून सारवून घेणे, खळी करणे, भात कापणी, झोडणी या कामांत तो व्यस्त आहे.
अंगण करताना चोपण्याचा होणारा आवाज हेच शेतकऱ्यांचे फटाके आहेत. शेतातील धान्य घरी आणण्याच्या लगबगीत त्याचा दिवस जातो आहे. विश्रांतीला दिवाळीचा फराळ याचा आनंद घेत शेताच्या बांधावरच आपली दिवाळी समजून कष्ट करीत आहे. रात्रीच्या वेळी शेतात शेकोटी पेटवून, आरोळ्या ठोकून जंगली श्वापदांना पळवून लावताना पहारा देत पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. पावसांत भिजलेले धान्य, भात उन्हात सुकविण्यासाठी धडपड करताना वर्षभराच्या कष्टाचे फलित डोळ्यांना सुखावत आहे. दिवाळी सुटीत मुंबईकर गावात दाखल झाल्याने गावेही गजबजली आहेत.
मजुरांची कमतरता… – चिपळूण तालुक्यात यंदा पावसामुळे १७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. परतीच्या पावसाचा शंभरांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे भात कापणीला वेग आला आहे. तालुक्यात मजुरांची कमतरता भासत असल्याने ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, बांधणी, झोडणीच्या कामाला लागले आहेत. ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. लवकरात लवकर खळ्यांमध्ये पडलेले भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी गारवा असतो. दहा वाजल्यानंतर उन तापण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेतकरी पहाटे शेतात जाऊन कापणीवर जोर देत आहे. जमीन ओली असल्यामुळे सावर्डे, पोफळी, अलोरे, शिरगाव, मार्गताम्हने, असुर्डे, आरवली, कळंबट या भागातील शेतकरी भात कापून पेंढी रस्त्याच्या कडेला सुकण्यासाठी ठेवत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या साह्याने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत.
वन्यप्राण्यांमुळे रात्रीचा जागता पहारा – भात पीक तयार झाले असून, जंगली श्वापदांमुळे पिकांची नासाडी होत आहे. यावर उपाय म्हणून रात्रीचा पहारा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. फटाके फोडून आवाज करत त्यांना पळवून लावले जात आहे. प्राण्यांना पळविण्यासाठी आग पेटवून भयभीत करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

