जिल्ह्यात फटाक्यांची विक्री आणि साठा करून ठेवणाऱ्या विक्रेत्यांनी या संदर्भातील परवाने जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे परवाने नाहीत, अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. दिवाळी सण आनंदात साजरा करताना जबाबदारीसह कायद्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळले गेले पाहिजेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल उभारले आहेत. विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांच्या साठा करून ठेवण्यात आला आहे. फटाक्यासारख्या स्फोटक पदार्थामुळे अपघाताची शक्यता असते, त्यातून जीवितही आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार विक्री आणि साठा करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक केले आहे.
ज्यांच्याकडे परवाना नसेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. फटाके विक्रीतून नफा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हा मोसमी व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल असतो. आवश्यक काळजी न घेता जागा मिळेल तिथे स्टॉल थाटून व्यवसाय करण्यावर अधिक भर असतो. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा प्रकाराचा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. ज्यांच्याकडे आवश्यक परवाने नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.

