गेले १५ दिवस दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने शेतकरी हैराण झाले होते. मात्र, शनिवारपासून (ता. २६) पावसाने विश्रांती घेतल्याने रत्नागिरी तालुक्यातील गोळप, पावस पंचक्रोशीत भात कापणी व झोडणीच्या कामाला वेग आला आहे. दिवाळी तोंडावर आली असली, तरी शेतकरी आता दिवाळीपेक्षा शेतातील धान्य घरात आणण्याच्या कामात मग्न झाले आहेत. त्यामुळे परिसरामध्ये ६० टक्के कापणी पूर्णत्वास गेली आहे सुरुवातीपासून सप्टेंबरपर्यंत पावसाने सातत्य ठेवल्याने यावर्षी चांगले पीक तयार झाले होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली. अनेक ठिकाणी हळवी भातशेती पावसामुळे आडवी झाल्याने नुकसान झाले. आडव्या पडलेल्या भाताला पुन्हा कोंब आल्याने शेतकऱ्याने डोक्याला हात लावला होता. पाऊस विश्रांती घेत नसल्याने कापणीही करता येत नव्हती. दुपारपर्यंत कडकडीत ऊन आणि नंतर पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला होता. हातातोंडाशी आलेले पीक पावसात वाया जाईल का? अशी भीती त्याला लागून राहीली होती.
दिवाळी तोंडावर आली, तरी धान्य घरात येत नव्हते. काही ठिकाणी कापलेले भात सुकवणे यातच शेतकऱ्यांचा वेळ जात होता. आता महान पीकही कापणीस तयार झाले आहे. गेले दोन दिवस पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण दिवस शेतातच असल्याचे चित्र गोळप, पावस पंचक्रोशीत दिसून येत आहे. न्याहारी, जेवणही शेतातच घेतले जात आहे. कुटुंबातील सर्व सदस्य कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. सोमवारपासून दिवाळी सुरू होणार असली, तरी दिवाळीपेक्षाही वर्षभराचे धान्य वेळेत घरी आणण्याची गडबड सुरू झाली आहे. सकाळी भात कापल्यानंतर दुपारनंतर लगेच झोडले जात आहे. त्यासाठी शेतातच खळी तयार करण्यात आली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी आता दिवाळी साजऱ्या करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. पुढील आठ दिवसांत पंचक्रोशीतील कापणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची दिवाळी ही आता शेतातच साजरी होणार, असे काहीचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाकडेही लक्ष – दररोज हवामान खात्याच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष आले. खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतातील धान्य घरात आणण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.