26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeRatnagiriलांजात ऐन दुपारी तिघांवर कुऱ्हाड आणि पहारेने जीवघेणा हल्ला

लांजात ऐन दुपारी तिघांवर कुऱ्हाड आणि पहारेने जीवघेणा हल्ला

या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोनजणं गंभीररित्या जखमी झाले आहेत.

गुरुवारी भर दुपारी तालुक्यातील पनोरे कवचेवाडीमध्ये तिघांवर कुऱ्हाड आणि पहारीने जीवघेणा हल्ला झाल्याने गावकरी हादरले आहेत. या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दोनजणं गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनोरे गावातील कवचेवाडीमध्ये दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला, याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, सुरेश तुळाजी कवचे हे गुरुवारी १८ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घराजवळच कवचेवाडी परिसरात लाकडे फोडत होते.

त्यावेळी शैलेश महादेव कांबळे (रा. पनोरे बौद्धवाडी) हा त्या ठिकाणी आला. त्याने सुरेश तुळाजी कवचे. यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जानू रघुनाथ कवचे हे त्या ठिकाणी धावत गेले असता शैलेश कांबळे याने त्यांच्या डोक्यावरही कुऱ्हाडीने व पहारीने हल्ला केला. या हल्ल्यात जानू रघुनाथ कवचे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शैलेश कांबळे हा पुढे गेला असता सुरेश संभाजी कवचे हे आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी शैलेश कांबळे याने सुरेश संभाजी कवचे यांच्या डोक्यात आणि कमरेवर पहारीने प्रहार केला.

या हल्ल्यात सुरेश संभाजी कवचे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, पोलीस हेड. कॉन्स्टेबल. सचिन भुजबळराव, राजेंद्र कांबळे, तेजस मोरे, अरविंद कांबळे तसेच अन्य पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेप्रकरणी संशयित आरोपी शैलेश कांबळे याला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. त्याची चौकशी रात्रौ उशिरापर्यंत सुरू होती. तर शैलेश कांबळे यांनी कोणत्या कारणातून हा हल्ला केला त्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

मात्र या घटनेने लांजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सुरेश तुळाजी कवचे व सुरेश संभाजी कवचे यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलण्यात आले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत अधिक तपास सुरू होता..

RELATED ARTICLES

Most Popular