मध्य महाराष्ट्रावरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात ढगाळ वातावरण आहे. पुढील ३ ते ४ दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्याचे वातावरण कीड व रोगांच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. या कालावधीत आंबा पिकावर फुलकिडी, फळमाशी किंवा करप्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर काजू पिकावर ढेकण्या, फुलकीड आणि बोंडू व बी पोखरणारी अळी वाढते. तरी आंबा आणि काजू बागायतदारांनी बागेची नियमितपणे पाहणी करून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाने आंबा व काजू बागायतदारांना केले आहे.
अवकाळी पाऊस झाल्यास फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्याकरिता विद्यापीठाने विकसित केलेले रक्षक सापळे (मिथिल युजेनॉल ल्युअर्ससह) प्रतिहेक्टर ४ या प्रमाणात बागेमध्ये लावून फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येईल. काजूमध्ये मुख्यत्वे काजूवरील ढेकण्या, फुलकिडी आणि बोंडू व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या मोहोर व बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली असल्याने त्याची वेळीच पाहणी करावी. काजूवरील ढेकण्या आणि बोंडू व बी पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एका कीटकनाशकाची तसेच काजूवरील फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास औषध फवारणी करावी.
याबाबत आंबा बागायतदार स्वप्नील गुरव म्हणाले, सध्या जो आंबा तयार झाला आहे तो काढण्याचे काम जोरात सुरू आहे. सध्याच्या बिघडलेल्या वातावरणाचा ज्या ठिकाणी मोहोरापासून फळ तयार होण्याची सुरुवात आहे किंवा बऱ्यापैकी कैरी आली आहे त्या ठिकाणी बुरशी पकडून रोग उद्भवण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर असेच वातावरण राहून सलग पाऊस पडला तर मात्र बागायतदारांचे नुकसान होऊ शकते. सध्या आम्ही रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा वापर जास्त करत आहोत.