शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर प्रथम श्रेणी दर्जाचे रणजी क्रिकेट सामने होण्याच्यादृष्टीने पूरक असे क्रीडांगण उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. पूर्वी या ठिकाणी सर्व प्रकारच्या क्रीडास्पर्धा, विविध कार्यक्रम होत होते; मात्र आता ते फक्त क्रिकेटसाठीच ठेवण्यात येईल तसेच या मैदानावर नाईट स्पर्धा होण्यासाठी प्रखर विजेचे दिवे (फ्लडलाईट) लावले जाणार असून, त्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी शहरातील सर्वात मोठे आणि सर्व खेळांना उपयुक्त असे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावर प्रथितयश खेळाडू खेळून गेले आहेत. काही वर्षांपूर्वी याच मैदानावर सलग तीन वर्षे रणजी सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले होते; मात्र त्यानंतर मैदानाची योग्य काळजी न घेतल्यामुळे रणजीच नव्हे तर अन्य राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धाही होऊ शकल्या नाहीत.
गुणवत्ता असूनही अनेक मुले दर्जेदार क्रिकेटपासून वंचित राहिली. दोन वर्षांपूर्वी या क्रीडांगणाच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी पुढाकार घेऊन तीन कोटींचा निधी दिला. त्यामुळे प्रेक्षक गॅलरी, सुसज्ज अशा खेळपट्ट्या मिळून ६५ यार्डाचे मैदान बनवण्यास सुरवात झाली. मैदानाच्या बाजूने कुंपणही घालण्यात आले आहे. हे मैदान बनवण्यासाठी विविध प्रकारचे चार थर टाकण्यात आले आहेत. पावसाळ्यामध्ये मैदानावर विशिष्ट प्रकारचे गवत रोपण केले जाईल.
मैदानासाठी खेळपट्टी तज्ञांचे मार्गदर्शनही घेण्यात आले आहे. प्रथम श्रेणीच्या दर्जाचे सामने, विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा या ठिकाणी खेळवणे शक्य होईल. मैदानावर पाणी साचून राहू नये यासाठी अंडरग्राउंड ड्रेनेज यंत्रणाही उपलब्ध आहे. त्यामुळे सामना सुरू असताना पाऊस पडला तरीही मैदान अर्ध्या तासात पुन्हा खेळण्यायोग्य बनवता येईल, अशी अत्याधुनिक यंत्रणा तयार केली आहे. त्याचबरोबर मैदानावर कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर्सही लावण्यात येतील. सुसज्ज मैदान उभारणी सुरू असतानाच या ठिकाणी दिवस-रात्र सामने भरवले जावेत यासाठी पालकमंत्री सामंत यांनी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अत्याधुनिक लाईट सुविधा लवकरच उभारण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर सर्वसाधारण डिसेंबर महिन्यापर्यंत क्रीडांगणाचे लोकार्पण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या वेळी एखादा रणजी सामना भरवण्याचे नियोजनही सुरू आहे.