गौरी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील पालिकेने जोरदार तयारी केली होती. विशेषतः या उत्सवात कुठेही कचरा साचून राहणार नाही याची खबरदारी घेतली होती. त्यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. या कलशातून सुमारे अडीच टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. गणेश विसर्जनानिमित्ताने जमा झालेल्या अडीच टन निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाने या कामी मोठी मेहनत घेतली. शहरातील नागरिकांनी मंगळवारी गौरी गणपतीला वाजतगाजत भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यावेळी घरगुती व काही सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. काहींनी पालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम तलावात गौरी गणपतींचे विसर्जन केले. निर्माल्य संकलन करण्यासाठी सर्व विसर्जन घाटाच्या ठिकाणी कलश ठेवण्यात आले होते.
पालिकेच्या वतीने शहरातील २२ विसर्जन घाटाच्या ठिकाणाहून सुमारे अडीच टन निर्माल्य संकलित झाले. त्यापासून चिपळूण पालिकेच्या मालकीच्या शिवाजीनगर येथील घनकचरा प्रकल्पावरील ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशिनमध्ये खतनिर्मिती केली जात आहे. या कामासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी मेहनत घेतली. त्याकरिता आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य साहाय्यक वैभव निवाते व सफाई कर्मचाऱ्यांनी या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न केले. दोन घंटागाड्यांच्या माध्यमातून बुधवारी निर्माल्य संकलित करण्यात आले. पालिकेच्या या मोहिमेचे शहरवासीयांतून कौतुक होत आहे.