आंबोली येथे पर्यटनासाठी आलेले गोव्यातील तरुण आणि बांदा येथील स्थानिक तरुण यांच्यामध्ये वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना किरकोळ वाद हातघाईवर आला. गोव्यातील तरुणांनी दाणोली पोलीस नाक्यापर्यंत पाठलाग करत बांद्यातील तरुणांच्या कारवर हेल्मेट आपटले आणि वाद उफाळला. हा वाद सावंतवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. दरम्यान यावेळी अटकाव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच एका तरुणाने म ारहाण केल्याची चर्चा असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. मंगळवारची बांदा बाजारपेठ बंद असल्याने, बांदा येथील पाच पर्यटक आंबोली येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. आंबोली घाट उतरत असताना, त्यांनी गोव्यातील दुचाकीस्वरांना बाजूला होण्यास सांगितले. यावरून वाद सुरू झाला. गोव्यातील सुमारे १० ते १५ तरुण आंबोली पर्यटन स्थळावर एकत्र आले होते. त्यांनी बांदा येथील कारचा पाठलाग केला.
दाणोली येथील पोलीस नाक्यावर कार थांबताच, गोव्यातील तरुणांनी एकत्र येऊन हेल्मेटने कारवर आदळत दादागिरी केली. त्यानंतरही त्यांचा पाठलाग सुरूच होता. सावंतवाडी बस स्थानकासमोरील बांधकाम विभागाच्या वळणावर त्यांनी कारसमोर दुचाकी लावून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आबा पिळणकर आणि सुनील नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही गोव्यातील तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांदा येथील कार चालकही तेथे पोहोचले होते.
पोलिसांनी विचारपूस करत असतानाच, गोव्यातील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन एक्स-रे काढण्यात आले. या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, शरद लोहकरे, अमित राऊळ, आबा पिळणकर, सुनील नाईक आणि अन्य पोलिसांनी गोव्यातील तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोवा राज्यातील तरुणांना आंबोली पर्यटनाची झिंग चढल्याप्रमाणे त्यांनी उद्धट भाषा वापरली आणि पोलिसांशीही झटापट केली असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण हे पोलिस ठाण्यात नव्हते, त्यांनी मोबाईल वर बोलताना आपण गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे असे म्हटले आहे.