संगमेश्वरमधील शास्त्री पूल ते संगमेश्वर बसस्थानक या महामार्गावर पावसाळ्याआधीच दरडी कोसळण्याचे प्रकार घडत होते. ३५ ते ४० फूट अशाप्रकारे डोंगर उभे खोदले. त्यावेळी कुठल्याही बांधकाम अभियंता, विकासक, लोकप्रतिनिधीना संभाव्य धोक्याची कल्पना न यावी हे एक कोडेच असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. या महामार्गाची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज असून संबंधितांनी ती करावी, अशी मागणी होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जी खोदाई केली आहे, त्याचे प्रताप दिसू लागले आहेत. ज्या डोंगर माध्यावर नागरी वस्ती आहे. आज पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत ते पाणी या खोदलेल्या मातीतून मार्ग काढणे अवघड आहे. कारण तशी पर्यायी व्यवस्था नाही. आज यामुळे महामार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. यापुर्वी दरड कोसळली, तेव्हा संरक्षक भिंतीचा प्रश्न ऐरणीवर आला.
संरक्षक भिंतीचे काम धिम्या गतीने सुरू झाले खरे पण त्या संरक्षक भिंतीची उंची किती असावी? हा प्रश्न वाऱ्यावर सोडून दिला. संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना दरड कोसळली आणि गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला. लोकप्रतिनिधींना आपल्या गैरसोयीचा पाढा वाचून दाखवला. पण ठेकेदारांचा बेजबाबदारपणा आज मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकतो. ठेकेदारांच्या बेजबाबदारपणाचे दाखले जागोजागी सापडत आहेत. नव्याने बांधलेला काँक्रीटचा रस्ता खचला, काही ठिकाणी भेगा पडल्या. आता या भेगामधून पावसाचे पाणी विसर्गाचा मार्ग शोधणार? तर उद्या या महाम ार्गावर भगदाडे पडतील, मग होणाऱ्या गैरसोयीला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
आज निसर्गाच्या नियमाला आव्हान देणारी आमची विकासाची स्वप्ने अधोगतीला आमंत्रित तर करणार नाहीत ना? असा भाबडा प्रश्न मनात उपस्थित होतो. काटकोनात खोदलेले डोंगर कशाच्या आधारावर भक्कमपणे उभे राहतील हे आधी तपासले होते काय? त्याचे नियोजन होणे गरजेचे होते. केवळ डोळेझाक केल्याने ही गंभीर समस्या भविष्यात अक्राळविक्राळ रुप धारण करील की काय? अशी धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी घसरणाऱ्या दरडींपासून संरक्षण व्हावे म्हणून संरक्षक भिंती बांधल्या त्या संरक्षक भिंतींना तडे गेले. काही ठिकाणी नवीन संरक्षक भितींनी माना टाकल्या आहेत. या सर्वांची जबाबदारी कोण स्विकारणार? असा सवाल नागरिक करत आहेत.