लोटे परशुराम एमआयडीसीमधील काही कारखान्यांकडून पावसाचा फायदा घेत कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी सोडले जात आहे. परिणामी नदीप्रदूषणाचे प्रमाण वाढले असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा कारखान्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीने तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली. सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती (दिशा) यांची बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, तसेच विविध विभागांचे अधिकारी व समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार तटकरे यांनी या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आयोजित होणाऱ्या शिबिरांबाबत दिशा समितीच्या सदस्यांना निमंत्रित करावे, लाभार्थ्यांची निवड कशी झाली याची तालुकानिहाय माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. महावितरणने मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेसाठी वेगाने कार्यवाही करावी, अशी म ागणीही त्यांनी मांडली. कोकण रेल्वेने जिल्ह्यातील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, तसेंच प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे, खनिकर्म निधीचे सात भागांत वाटप करून त्याचा योग्य वापर करावा, जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण व अपूर्ण योजनांची यादी व त्या कामांची ठेकेदारानिहाय माहिती द्यावी, अशी सूचनाही तटकरे यांनी केली. काही ठिकाणी, जलजीवन मिशनची कामे पूर्ण असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, ही गंभीर बाब असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गुहागरमधील पाणीपुरवठा योजना पूर्ण करून स्ट्रीट लाईटचर्ची समस्या मार्गी लावावी, पाचपांढरी गावात प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधावा, आंणि त्यांच्या सम स्या शासनाकडे मांडण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना देतानाच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी खासदार तटकरे यांनी प्रशासनास खडसावले. कोकाकोला कंपनीविरोधात मूकमोर्चा काढणाऱ्या ४०० नागरिकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबतही तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. एसपींनी यावर तातडीने अहवाल द्यावा, आणि जर चुकीची कारवाई झाली असेल तर तो विषय इथेच संपवावा. माझ्या मतदारसंघात अशा अन्यायकारक कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
कोकाकोला कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. बैठकीत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर म करण्यात आला असून, निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य सतीश दिवेकर, सखाराम कदम, सुरेश सावंत, नेहा जाधव, संदीप बांदकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.