खेडमध्ये भरदिवसा हवेत गोळीबार झाल्याची चर्चा शनिवारी सायंकाळी अचानक सुरू झाली आणि हा हा म्हणता साऱ्या खेड शहरात पसरली. ज्याठिकाणी ‘फायरिंग’ झाल्याची चर्चा सुरू होती, तेथे अनेकांनी धाव घेतली. चर्चा इतकी जोरात सुरू झाली की तिथे तोबा गर्दी उसळली. त्याची दखल घेत पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. शनिवारी वाजण्याच्या सायंकाळी ६ सुमारास खेडच्या बाजारपेठेत एक बातमी धडकली. मुंबई-गोवा महामार्गावर खोपी फाटा परिसरात गोळीबार झाल्याची ती बातमी होती. २ तरूणांनी -दुचाकीवरून एका कारचा पाठलाग केला आणि ती कार थांबविली. कार थांबताच तिच्यावर दगडफेक करण्यात आली आणि तिच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच त्यानंतर एका तरूणाने रिव्हॉल्वर काढून थेट फायरिंग केली, अशी सारी सविस्तर कहाणी चर्चेत आली.
हा हा म्हणता पसरली – सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही चर्चा सुरू झाली आणि वायूवेगाने सर्व शहरात पसरली. अनेकांना सोशल मिडियावरून याबाबत कळले. त्यामुळे चर्चेला अधिकच पेव फुटले.
घटनास्थळी धाव – गोळीबार झाल्याची चर्चा इतकी जोरात सुरू झाली की अनेकांनी चर्चे त आलेल्या खोपी फाटा परिसरात धाव घेतली. खेडचे पोलिसदेखील आले. तेव्हा तिथे काचा फोडलेली मोटर आढळली. याच मोटरवर गोळीबार झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र तो कधी, का आणि कोणी केला, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नव्हते. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली. फायरिंग झाल्याची चर्चा सुरू असल्याने एखादी पुंगळी (झाडलेली गोळी) सापडते का, याचा शोध सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाऊ लागले. मात्र काहीच सापडले नाही.
पोलिसांचा इन्कार – तोपर्यंत गोळीबार झाल्याची चर्चा अधिकच फैलावली होती. पोलिसांचे फोनदेखील खणखणू लागले होते. दरम्यान पहाणीनंतर गोळीबार झालेला नाही, असे खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले. आमचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जातीनिशी चर्चेतील ठिकाणी जाऊन आले, मात्र असा प्रकार घडला नसल्याचे इन्स्पेक्टर भोयर यांनी स्पष्टपणे सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले. परंतु त्यामुळे चर्चा बंद झाली नाही, तर वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत..
‘ती’ कार कोणाची? – मग ती काचा फुटलेली कार कोणाची होती? तिच्यावर दगडफेक कोणी आणि का केली? असे प्रश्न चर्चेद्वारे उपस्थित केले जात आहेत. एकंदरीत चर्चेचा बाजार गरम होता.