गेली सहा वर्षे रखडलेल्या मुख्य हायटेक बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा चार महिन्यांतच पहिला स्लॅब टाकून झाला. त्यामुळे ठेकेदार कंपनी असलेल्या निर्माण ग्रुपने वेगाने या बसस्थानकाच्या कामाला सुरुवात केल्याने फरफट होत असलेल्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्य हायटेक बसस्थानकाचा जूना ठेका रद्द केल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया करून रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका देण्यात आला. मुळातच सहा ते सात वर्षे हे काम रखडल्याने या कामाला टाईमबॉण्ड देण्यात आला आहे. त्यानुसार टार्गेट घेऊन ठेकेदार कंपनी हे काम करत आहे.
१० कोटींवरून आता हे काम १८ कोटींवर गेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत याला निधी दिला जाणार आहे. काम रखडल्याने प्रवाशांची फरफट होत आहे. ऊन, पावसात प्रवासी रस्त्यावर असतात. त्या ठिकाणी गाड्या लागल्या की वाहतूक कोंडी होते. अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काम होण्यासाठी आंदोलन केले. नागरिकांचा रोष वाढत गेल्यामुळे शासनाने यावर पर्याय काढून ठेकेदार बदलून कामाला सुरुवात केली.