प्रदूषणाने चर्चेत अधूनमधून असलेल्या दाभोळखाडीतून खेडकडे वाहणाऱ्या जगबुडी नदीतील आयनी भोईवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी मच्छीमारांच्या जाळ्यात सुमारे ८०० किलो मासळी सापडलेली असतानाच २ दिवसांपूर्वी पुन्हा तब्बल २ टन मासळी मिळाल्याचा प्रकार घडला आहे. या अचानक सापडलेल्या बंपर मासळीमुळे मच्छीमार अक्षरशः चक्रावून गेले आहेत. त्याचबरोबर कुतूहलही निर्माण झाले आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या खाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालत आला आहे. यापूर्वी प्रदूषणाने शापित झालेली ही खाडी हळूहळू मूळ पदावर येत असल्याचे चित्र अलिकडच्या काळात घडत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोटेतील सीईटीपीमध्ये फार मोठे बदल झाले. विस्तारीकरणाबरोबरच प्रदूषण नियंत्रणाच्यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना केली गेल्याने प्रदूषणाला पूर्वपेक्षा बऱ्याच प्रमाणात आळा बसला असल्याने बऱ्यापैकी मासळी खाडीत मिळत असल्याचे समोर आले आहे.
तरीही अधूनमधून प्रदूषणाच्या तक्रारीने खाडी चर्चेत रहात असली तरी अचानकपणे सापडणाऱ्या बंपर मासळीने खाडी अधिक चर्चेत येऊ लागली आहे. स्थानिक मच्छीमार आणि दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीचे सचिव संतोष बंदरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आयनी-भोईवाडी येथील मच्छीमारांनी नेहमीप्रमाणे नदी किनारी जाळे लावले असतानाच एकाचवेळी मोठ्या प्रम ाणात मासळी जाळ्यात अडकली. या मासळीत मांगण जातीचा मासा अधिक प्रमाणात होता. त्याचबरोबर पालू, कालचडू आदी स्थानिक जातींच्या माशांचा समावेश होता. तब्बल दोन टनांहून अधिक मासळी मिळाल्याने ती नंतर घाऊक पद्धतीने बाहेरील व्यापाऱ्यांना विकण्यात आली होती. गेल्या दोन-तीन वर्षापासून अशाच प्रकारे अधूनमधून शेकडो किलो मासे जाळ्यात सापडतात. तर काही वेळेला अगदी किरकोळ प्रमाणात मिळतात. बंपर मासळी ही अपवादानेच मिळत असते. मात्र अचानकपणे एवढी मासळी मिळाल्यानंतर मच्छीमारही चक्रावून जात आहेत.
विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी या परिसरात ८०० किलो मासळी मिळाली होती. गतवर्षीदेखील याच परिसरात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात मासळी सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे वर्षातून एखाद्या वेळेस अशी अचानकपणे मासळी मोठ्या प्रमाणात सापडण्यामागे नेमके कारण काय, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. नदीचा प्रवाह, पाण्याची पातळी, हवामानातील बदल की अन्य काही नैसर्गिक घटक यामागे कारणीभूत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

