दोन महिन्यांच्या बंदीनंतर १ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी जलदी क्षेत्रातील मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. या नव्या मासेमारी हंगामाचा मुहूर्त साधण्यासाठी मच्छीमार सज्ज झाला आहे. त्यासाठी किनाऱ्यावर लावलेल्या मच्छीमारी बोटी समुद्रात आणण्याची लगबग सुरू झाली आहे. जाळ्यांच्या साफसफाईसह मच्छीमार या हंगामासाठी सज्ज झाला आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती. ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू करण्यात आली होती.
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना बंदी लागू नव्हती. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. मासळी उत्पादन वाढण्यासाठीचा हा काळ महत्त्वाचा असतो. त्यामुळे शासनाकडून या काळात यांत्रिकी नौकांना मासेमारीसाठी बंदी घातली जाते. शासनस्तरावरून घालण्यात आलेली मासेमारी बंदी १ ऑगस्टला उठणार आहे. मासेमारी हंगामाला सुरुवात होणार आहे. हवामानाचा अंदाज घेऊन मच्छीमारांना मासेमारीचा मुहूर्त साधावा लागणार आहे. १ ऑगस्टला बंदी उठणार असली तरी समुद्र शांत होत नसल्याने बहुसंख्य मच्छीमार नारळी पौर्णिमेलाच हंगामाची सुरुवात करतात.