गेले चार दिवस पावसाचा जोर कमी झाल्यामुळे समुद्रातील वातावरणही निवळल्यासारखं वाटत आहे; परंतु खाडीमध्ये उभ्या केलेल्या नौका गाळाअभावी बाहेर काढणे अशक्य आहे. भरतीच्या वेळीच नौका बाहेर काढायला लागणार आहेत. अमावास्येनंतरच म्हणजे ४ ते ५ तारखेनंतरच नौका मासेमारीला बाहेर पडतील, अशी माहिती गुहागर, मंडणगड आणि दापोली तालुका मच्छीमार संघर्ष समितीचे सदस्य महेंद्र चोगले यांनी दिली. मासेमारी बंदीचा काळ बुधवारी (३१ जुलै) संपला. त्याप्रमाणे अधिकृतरित्या गुरुवारपासून (ता. १ ऑगस्ट) मासेमारीला सुरुवात होणार आहे; मात्र हर्णे बंदरातील मासेमारी प्रारंभास आंजर्ले खाडीतल्या गाळाचा फटका बसणार आहे.
गाळामुळे नौका बाहेर काढणे अशक्य असल्याने नौका अजूनही आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत. गेले १५ ते २० दिवस पावसाने प्रचंड थैमान घातले. अतिवृष्टीमुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाला होता. ४० ते ४५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे त्या वेळी मच्छीमारांनी ऑगस्टच्या ५ तारखेनंतरच मुहूर्त करायचे ठरवले होते; परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हर्णे बंदरातील ६५ टक्के नौका आंजर्ले खाडीतच आहेत. त्यांना मासेमारीसाठी खाडीतून बाहेर पडण्यासाठी आंजर्ले खाडीच्या तोंडावर असलेल्या गाळाचा अडथळा होत आहे.
गाळ असल्याने आताच्या परिस्थितीत नौका मासेमारीसाठी बाहेर काढणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ४ ऑगस्टला अमावस्या आहे. अमावास्येला समुद्राला उधाण येते. त्यामुळे खाडीमध्ये भरतीचे पाणी वाढते. त्याचवेळी नौका खाडीतून बाहेर काढणे शक्य होणार आहे. मच्छीमारांनी मासेमारीला जाण्याची तयारी केली. अमावास्येच्या उधाणानंतरच नौका मासेमारीला बाहेर पडतील. आंजर्ले खाडीच्या बंधाऱ्याचे काम म्हणजे ५० टक्के काम झाले आहे; परंतु गाळ काढल्याशिवाय पूर्ण काम होणार नाही आणि खाडीच्या तोंडावर असणारा गाळ मोकळा होणार नाही.
जेटी होईपर्यंत आंजर्ले खाडी ही येथील मच्छीमारांसाठी सुरक्षित जागा आहे. शासनाने लवकरात लवकर गाळ काढून खाडीचे प्रवेशद्वार मोकळे करून घ्यावे, अशी मच्छीमारांची मागणी आहे, असे, मच्छीमार संघटनेचे सदस्य महेंद्र चोगले यांनी सांगितले.